गांजा बाळगल्याप्रकरणी चऱ्होली परिसरात युवकाला अटक
पिंपरी, ता. ८ - पिंपरी-चिंचवड परिसरातील दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अमली पदार्थविरोधी कारवाईत १९ वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई मंगळवारी (ता. ७) दुपारी चऱ्होली येथील पठारे चौकातून लोहगावकडे जाणाऱ्या रस्त्याकडेला करण्यात आली.
या प्रकरणी शरद अशोक विंचू (वय ४२), पोलीस हवालदार, दिघी पोलीस ठाणे यांनी फिर्याद दिली आहे. आरोपी आर्यन कृष्णा रसाळ (वय १९, रा. कोतवालवाडी, चऱ्होली बु., ता. हवेली, जि. पुणे) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीकडून ५४८ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला असून त्याची अंदाजे किंमत २७,४०० रुपये आहे. हा अमली पदार्थ आरोपीने बेकायदेशीररीत्या विक्रीसाठी आपल्या ताब्यात ठेवला होता.
या प्रकरणी एन.डी.पी.एस. कायद्यांतर्गत कलम ८(क), २०(ब)(ii)(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.