निगडीमध्ये तरुणीला मागितली खंडणी, आरोपी अटकेत
पिंपरी, ता. ८ - यमुनानगर-निगडी येथे परिसरातील यमुनानगर येथील एका तरुणीला एक लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. पैसे न दिल्यास त्या महिलेला जीवे मारण्याची धमकी आरोपीने दिली आहे. या प्रकरणी निगडी पोलिसांनी आरोपी विशाल देवकर (वय ३२, रा. बोदवड, जि. जळगाव) याला अटक केली आहे.
याबाबत, तरुणीने तक्रार दिली आहे. ४ एप्रिल २०२६ रोजी सकाळी सुमारे ११.१५ वाजण्याच्या सुमारास यमुनानगर येथील “खान्देशी तडका” हॉटेलमध्ये ही घटना घडली. आरोपी विशाल प्रल्हाद देवकर हा हॉटेलमध्ये आला. त्याने “मी गुन्हेगार आहे” असे म्हणत शिवीगाळ केली आणि हॉटेल चालवायचे असल्यास १ लाख रुपये देण्याची मागणी केली. तसेच पैसे न दिल्यास मारहाण करण्याची आणि हॉटेलची तोडफोड करण्याची धमकी दिली.
घटनेनंतर फिर्यादी महिलेने निगडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार, पोलिसांनी आरोपी विशाल देवकर याला अटक केली आहे. मंगळवारी (ता. ७) निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०८ (२) व ३०८ (३) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.