सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन करणाऱ्या महिलेला नोटिस
पिंपरी, ता. ८ - वेश्याव्यवसायाच्या उद्देशाने सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन करणाऱ्या महिलेविरोधात दिघी पोलीस ठाण्यात अनैतिक व्यापार प्रतिबंधक (पिटा) कायदा १९५६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (ता. ७) सायंकाळी सुमारे ४.३० वाजण्याच्या सुमारास आळंदी येथील योगीराज चौक, आळंदी-चाकण रोडवरील योगीराज लॉजसमोर आरोपी महिलेने सार्वजनिक ठिकाणी अश्लील हावभाव करुन व अश्लील शब्द उच्चारुन फिर्यादी तसेच इतर नागरिकांशी गैरवर्तन केले. तसेच फिर्यादीच्या अंगावर हात फिरवून आणि रस्त्यावरुन जाणाऱ्या नागरिकांना अडथळा निर्माण होईल असे वर्तन केल्याचा आरोप आहे. या कृतीमुळे सार्वजनिक सभ्यतेचा भंग झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी पोलीस शिपाई सोमनाथ बाळू खळसोडे (वय ३६, बकल नंबर ३०६३, दिघी पोलीस ठाणे) यांनी फिर्याद दिली आहे. संबंधित महिलेला भारतीय नागरी सुरक्षा संहिता कलम ३५(३) नुसार नोटीस बजावण्यात आली आहे.