सहकारी पतसंस्थांनी कामकाज पारदर्शक ठेवणे काळाची गरज - सहकार उपनिबंधक मिलींद सौबले
पिंपरी, ता. ६ - ''सहकारी पतसंस्थांनी आपले आर्थिक अहवाल व नोंदी नियमित ठेवणे, शासनाच्या परिपत्रकांचे पालन करणे, लेखापरीक्षणाचे काटेकोर पालन करणे अशा पद्धतीने आर्थिक शिस्त जपली पाहिजे. शासनाच्या निर्देशांचे पालन करत नियमित लेखापरीक्षण आणि पारदर्शक कामकाजावर भर देणे, ही काळाची गरज आहे. '', असे सहकार (पतसंस्था विभाग) उपनिबंधक मिलिंद सौबले यांनी सांगितले.
महाराष्ट्र राज्य सहकारी संघ व पुणे जिल्हा सहकारी बोर्ड यांच्या संयुक्त विद्यमाने चिंचवड येथे बुधवारी (दि. ४) पगारदार सेवक पतसंस्थांच्या पदाधिकारी, संचालक व सेवकांसाठी तीन दिवसीय प्रशिक्षण आयोजित केले होते. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी सौबले यांनी मार्गदर्शन केले. यावेळी पुणे जिल्हा सहकारी बोर्डाचे अध्यक्ष हिरामण सातकर, संचालक श्रीधर वाल्हेकर, उपनिबंधक नागनाथ कुंजीरे, सहकार तज्ज्ञ अॅड. अजित बोराडे, एसकेएफ इंडिया एम्पलॉइज यूनियनचे अध्यक्ष मोहन जगताप, साजिद पठाण, देवेंद्र घोडके, विलास लिंबोळे, डी. बी. मुळे उपस्थित होते.
सहकारतज्ज्ञ अॅड. अजित बोराडे यांनी बिगर कृषी सहकारी पतसंस्थांसाठी लागू असलेल्या महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमातील प्रकरण ११-१अ मथील तरतुदींवर सविस्तर मार्गदर्शन केले. पतसंस्थांनी ठेवी स्वीकारताना व कर्ज वितरण करताना आवश्यक कायदेशीर निकष पाळणे, शासनाच्या परिपत्रकांचे पालन करणे आणि संस्थेचे कामकाज पारदर्शक पद्धतीने चालविणे गरजेचे असल्याचे अॅड. बोराडे यांनी सांगितले. पुणे जिल्हा सहकारी बोर्डाचे अध्यक्ष हिरामण सातकर यांनी सहकारी चळवळीचे सामाजिक व आर्थिक महत्त्व स्पष्ट केले.