काळेवाडीत पैशाच्या वादातून युवकाचा खून, दोघांना अटक
पिंपरी, ता. २६ - पैशाच्या वादातून झालेल्या भांडणात दोघांनी चाकूने भोसकून २४ वर्षीय युवकाचा खून केला. ही घटना मंगळवारी (ता. २४) काळेवाडी येथील लकी बेकरी चौकात घडली. हाशिम सईद राईन (वय-२४ वर्षे) असे मयत युवकाचे नाव आहे. दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
या प्रकरणी अरबाज सईद राईन (वय २२, रा. विजयनगर, काळेवाडी) यांनी बुधवारी (ता. २५) काळेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आरोपी १) सदाम मो. मुमताज राईन (वय-३४ वर्षे) व २) शरीफ वली खान ऊर्फ जर्सी पठाण (वय-३० वर्षे) यांना अटक केली. दोन्ही आरोपी मूळचे उत्तरप्रदेशातील असून सध्या ते काळेवाडीत राहतात.
फिर्यादी अरबाज राईन व त्यांचा चुलत भाऊ मयत हाशिम राईन हे जेवण करुन घरी चालत जात असताना आरोपींनी त्या दोघांना अडवले. हाशिमकडे असलेल्या पैशाच्या कारणावरुन "आज इसने पैसे नही दिये तो इसका मर्डर करने का" असे बोलून भांडण करुन धक्काबुक्की केली. त्यावेळी फिर्यादी अरबाज मध्ये पडले असता त्यांनी त्याला मारहाण केली. हाशिम, अशपाक, उमर हे भांडण सोडविण्यास आले असता आरोपीने फिर्यादी अरबाजच्या डोळ्यावर चाकू मारला. पुन्हा हाशिम हा त्याला वाचविण्यास आला असता आरोपींनी हाशिमच्या छातीत चाकू भोसकून त्याचा खून केला.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम १०३, १०९, ११५ (२), ३५२, ३५१ (२)(३) व ३ (५) अन्वये बुधवारी (ता. २५) काळेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.