क्राईम रिपोर्ट -
शहरातील गुन्हेगारीविषयक बातम्या - ११ जुलै २०२६
--------------------------------------------------------------------------------------------------
पुनावळे येथे विनापरवाना देशी दारू विक्रीप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल
पिंपरी, ता. ११ जुलै २०२६ – पुनावळे परिसरात विनापरवाना देशी दारू विक्रीसाठी बाळगणाऱ्या एका २० वर्षीय तरुणावर रावेत पोलिसांनी महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत कारवाई केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही कारवाई १० जुलै २०२६ रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास पुनावळे येथील सिद्धसिला इला सोसायटीच्या पाठीमागे शेतातील मोकळ्या जागेत करण्यात आली.
या प्रकरणी पोलीस शिपाई सोमनाथ तुळशीराम बावळे (वय ३६, नेमणूक – रावेत पोलिस ठाणे) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सिध्दार्थ किशोर कांबळे (वय २०, रा. सिद्धसिला इला सोसायटीमागील पत्र्याचे शेड, पुनावळे) याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ (ई) नुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीकडे स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी विक्री करण्याच्या उद्देशाने देशी दारूच्या ९ बाटल्या आढळून आल्या. या बाटल्यांची एकूण किंमत ३६० रुपये असून, त्या विनापरवाना व बेकायदेशीररित्या बाळगल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
--------------------------------------------------------------------------------------------------
तडीपार आरोपीकडून कोयता जप्त; रावेत पोलिसांची कारवाई
पिंपरी, ता. ११ जुलै २०२६ – तडीपार आदेशाचा भंग करून विनापरवाना कोयता बाळगणाऱ्या एका तरुणावर रावेत पोलिसांनी कारवाई केली आहे. आरोपीकडून ८५० रुपये किमतीचा लोखंडी कोयता जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही कारवाई १० जुलै २०२६ रोजी दुपारी सव्वातीन वाजण्याच्या सुमारास रावेत येथील शिंदेवस्ती ते गणेशनगरकडे जाणाऱ्या ४० फुटी डांबरी रस्त्यालगत व्हिक्टोरी क्रिकेट अकॅडमीसमोरील मोकळ्या जागेत करण्यात आली.
याप्रकरणी पोलिस शिपाई प्रदीप कामाजी गायकवाड (वय ३६, नेमणूक – तपास पथक, रावेत पोलिस ठाणे) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी प्रेम गोरक्ष साकोरे (वय २४, रा. विठ्ठल रेसिडेन्सी फेज-१, आदर्शनगर, किवळे) याच्यावर भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ४ (२५) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७(१)(३) सह १३५, १४२ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत शस्त्रे बाळगण्यास बंदीचा आदेश लागू असताना आरोपीकडे लोखंडी कोयता आढळून आला. तसेच आरोपीला पोलीस उपआयुक्त परिमंडळ-२, पिंपरी-चिंचवड यांच्या आदेशानुसार पुणे जिल्ह्यातून १० नोव्हेंबर २०२५ ते ९ नोव्हेंबर २०२६ पर्यंत तडीपार करण्यात आलेले होते
--------------------------------------------------------------------------------------------------
नाणेकरवाडीत साडेआठ किलो गांजा जप्त; एकाला अटक
पिंपरी, ता. ११ जुलै २०२६ – नाणेकरवाडी (ता. खेड) परिसरात बेकायदेशीररित्या गांजा बाळगून वाहतूक करणाऱ्या एका व्यक्तीला चाकण दक्षिण पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीकडून ८ किलो २९० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला असून, त्याची किंमत अंदाजे ४ लाख १४ हजार ६०० रुपये आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही कारवाई १० जुलै २०२६ रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास नाणेकरवाडी येथील जीएमपी ऑटो कंपनीच्या पाठीमागील मोकळ्या जागेत करण्यात आली.
याप्रकरणी पोलीस शिपाई सुनील गोविंद भागवत (बक्कल क्रमांक २८७९, नेमणूक – चाकण दक्षिण पोलीस ठाणे, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलीप मधुकर शिंदे (रा. बालाजीनगर, मेदनकरवाडी, ता. खेड; मूळ रा. अंतरवाली टेंभी, ता. घनसावंगी, जि. जालना) याच्यावर एनडीपीएस कायदा १९८५ चे कलम ८ (क), २० (ड) (ii) (अ) व २९ नुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
चौकशीत आरोपीने हा गांजा समीर तडवी याच्याकडून आणल्याचे सांगितले आहे. त्यामुळे गांजा पुरवठा करणारा समीर तडवी हा या प्रकरणात पाहिजे आरोपी असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
--------------------------------------------------------------------------------------------------
बालेवाडीत सार्वजनिक ठिकाणी अश्लील हावभाव केल्याप्रकरणी महिलेवर गुन्हा
पिंपरी, ता. ११ जुलै २०२६ – बालेवाडी परिसरात सार्वजनिक ठिकाणी अश्लील हावभाव करून नागरिकांना अडथळा निर्माण केल्याप्रकरणी एका महिलेवर बावधन पोलिसांनी कारवाई केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना ९ जुलै २०२६ रोजी रात्री सव्वादहा वाजण्याच्या सुमारास बालेवाडी येथील राजवाडा गेटपासून उत्तरेकडे सुमारे २०० फूट अंतरावर, बालेवाडी स्टेडियमच्या सीमाभिंतीलगत असलेल्या सर्व्हिस रोडवर घडली.
याप्रकरणी महिला पोलिस शिपाई विशाखा राजेंद्र बंडी (बकल क्रमांक ४१४१, नेमणूक – बावधन पोलीस ठाणे, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी नफिसा तारीक सिद्दीकी (वय ४५, रा. गणपती माथा मंदिराच्या पाठीमागे, वारजे माळवाडी, पुणे) या महिलेवर अनैतिक व्यापारास प्रतिबंध अधिनियम १९५६ चे कलम ८ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, संबंधित महिला सार्वजनिक ठिकाणी लैंगिक हावभाव व शब्दांचा वापर करून ये-जा करणाऱ्या नागरिकांना अडथळा निर्माण करताना आढळून आली. यामुळे सार्वजनिक शिष्टाचाराचा भंग झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.
--------------------------------------------------------------------------------------------------