वडीलोपार्जित जमिनीच्या वादातून चुलत भावाचे घर जाळण्याचा प्रयत्न, देहूरोडमधील घटना
पिंपरी, ता. ३० - वडीलोपार्जित जमिन वाटपावरुन एकाने पेट्रोलने भरलेल्या बाटल्यांना सुतळी बॉम्ब चिटकवून व लाकडी टेंबा पेटवुन चुलत भावाचे घर पेटवण्याचा व त्याच्या संपूर्ण कुटुंबाला ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना रविवारी (ता. २९) पहाटे ३ वाजता शिवाजी चौक-देहूगाव येथे घडली.
आरोपीवर देहूरोड पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. .
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनिल पंढरीनाथ काळोखे (वय ७४) यांनी याबाबत तक्रार दिली आहे. सुनिल काळोखे यांचा चुलत भाऊ सुदाम किसन काळोखे (वय ६२) याने वडिलोपार्जित जमिनीच्या वाटपाच्या वादातून मनात राग धरुन त्यांच्या घराला आग लावण्याचा प्रयत्न केला.
आरोपी किसन याने चुलत भाऊ सुनील यांचे कुटुंब झोपेत असताना त्यांच्या घराच्या डायनिंग रुम व किचनच्या खिडक्यांच्या काचा फोडल्या. त्यानंतर पेट्रोलने भरलेल्या बाटल्यांना सुतळी बॉम्ब लावून घरात फेकल्या तसेच लाकडी टेंबा पेटवून ज्वलनशील पदार्थाच्या सहाय्याने घराला आग लावण्याचा व भावाच्या कुटुंबाला जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम १०९(१), ३२६(जी), ३२४(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अद्याप अटक केली नाही.