दिघी येथे कोणतीही कार्यरत अथवा हायटेक एमडी उत्पादन प्रयोगशाळा आढळून आलेली नाही, पिंपरी-चिंचवड पोलिसांची माहिती
दिघी येथे कोणतीही कार्यरत अथवा हायटेक एमडी उत्पादन प्रयोगशाळा आढळून आलेली नाही, पिंपरी-चिंचवड पोलिसांची माहिती
पिंपरी, ता. १३ जुलै २०२६ - काही प्रसार माध्यमांमध्ये दिघी भोसरी येथे एमडीची हायटेक प्रयोगशाळा उघड या शीर्षकाखाली वृत्त दिनांक १३ जुलै २०२६ रोजी प्रसिध्द झाले आहे. या वृत्ताच्या अनुषंगाने केंद्रीय अमली पदार्थ विभाग (CBN-Central Bureau of Narcotics)नीमच मध्य प्रदेश यांनी उपलब्ध करून दिलेल्या पडताळणी केलेल्या माहितीनुसार, दिघी येथे कोणतीही कार्यरत अथवा हायटेक एमडी उत्पादन प्रयोगशाळा आढळून आलेली नाही. मुख्य आरोपीने एमडी उत्पादनासाठी प्रयोगशाळेत आवश्यक उपकरणे पूण्यात आणुन ठेवलेली होते. सदर उपकरणे जप्त केले असून, पुण्यात प्रत्यक्ष एमडीचे उत्पादन सुरु असल्याच्या बातमीत तथ्य नाही. पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने ही माहिती दिली आहे.
पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने सांगितले आहे की, CBN नीमच (मध्य प्रदेश) यांनी ऑपरेशन वज्र अंतर्गत केलेल्या कारवाईदरम्यान फेब्रुवारी २०२६ मध्ये मंदसौर येथे नोंद झालेल्या गुन्ह्याच्या तपासात ८.१७ किलो मेफेड्रोन जप्त करण्यात आले होते. त्यानंतर झालेल्या तपासामध्ये महु (मध्य प्रदेश) येथे छापा टाकून मेफेड्रोन (MD)उत्पादन प्रयोगशाळेत ४३.८२ किलो मेफेड्रोन २६१.३२ किलो पूर्वरसायने (Precursor Chemicals) आदी उपकरणे जप्त करण्यात आली.
या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपीच्या चौकशीत मुख्य सुत्रधार राजस्थानातील असून, तो जोधपूर येथे एमडी उत्पादन प्रयोगशाळा चालवत असल्याने निष्पन्न झाले. त्याचबरोबर पुण्यातही एमडी उत्पादनासाठी आवश्यक उपकरणे त्याच्या एका नातेवाईकाच्या निवासस्थानी ठेवण्यात आल्याची माहिती समोर आली. या माहितीच्या आधारे CBN ने जोधपूर व पुणे यथे एकाच वेळी कारवाई केली.
पुण्यातील दिघी परिसरातील संबंधित ठिकाणाहून एमडी उत्पादनासाठी लागणारी सीलबंद खोक्यांमध्ये ठेवलेली उपकरणे जप्त करण्यात आले. मात्र संबंधित नातेवाईकांना या उपकरणांचा उद्देश माहिती नसल्याचे CBN च्या तपासात स्पष्ट झाल्याने पुण्यात कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
CBN, मध्य प्रदेश यांनी दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, पुणे (दिघी) येथे कोणतीही कार्यरत अथवा हायटेक एमडी उत्पादन प्रयोगशाळा आढळून आलेली नाही. मुख्य आरोपीने एमडी उत्पादनासाठी प्रयोगशाळेत आवश्यक उपकरणे पूण्यात आणुन ठेवलेली होते. सदर उपकरणे जप्त केले असून, पुण्यात प्रत्यक्ष एमडीचे उत्पादन सुरु असल्याच्या बातमीत तथ्य नाही. त्यामुळे काही प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिध्द झालेल्या दिघी भोसरी येथे एमडीची हायटेक प्रयोगशाळा उघड या आशयाच्या वृत्तांमुळे वस्तुस्थितीबाबत गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे. सर्व प्रसारमाध्यमांनी व नागरिकांनी वरील अधिकृत स्पष्टीकरणाची नोंद घ्यावी, ही विनंती.