स्टार बाजारमध्ये महागड्या वस्तू चोरणारी टोळी जेरबंद; सात जणांकडून ७.२१ लाखांचा मुद्देमाल जप्त

स्टार बाजारमध्ये महागड्या वस्तू चोरणारी टोळी जेरबंद; सात जणांकडून ७.२१ लाखांचा मुद्देमाल जप्त

वाकड | ३ सप्टेंबर २०२६ : पिंपरी-चिंचवड आणि पुणे परिसरातील स्टार बाजारमध्ये ग्राहक बनून प्रवेश करत तूप, काजू, बदाम यांसारख्या महागड्या वस्तू चोरणाऱ्या सराईत टोळीचा वाकड पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत चार महिला आणि तीन पुरुषांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून इनोव्हा कार, रिक्षा आणि चोरीच्या वस्तू असा एकूण ७ लाख २१ हजार ९६० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

२९ ऑगस्ट रोजी सायंकाळी सातच्या सुमारास दत्त मंदिर रोडवरील यशवंत बिल्डिंगमधील स्टार बाजार तसेच १२ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास काळेवाडीतील स्टार बाजारमध्ये चोरी झाली होती. आरोपींनी गोवर्धन तूप आणि घीचे पाऊच, बदाम, काजू तसेच इतर खाद्यवस्तू असा एकूण *४२ हजार १०० रुपयांचा माल* चोरल्याची तक्रार वाकड पोलिसांकडे दाखल झाली होती.

याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४७९/२०२६ भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५ आणि ३(५) अंतर्गत नोंदवण्यात आला. तपास पथकाने घटनास्थळासह परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीची तपासणी केली. चोरीसाठी वापरलेली इनोव्हा कार मुंबईच्या दिशेने गेल्यानंतर पुन्हा पिंपरी-चिंचवडमध्ये आल्याचे समोर आले. त्यानंतर ताथवडे-वाकड परिसरात इनोव्हा कार आणि रिक्षा ताब्यात घेऊन सात संशयितांना पकडण्यात आले.

पोलिसांनी रविकांत देवानंद जाकरे, ब्रिजेश सिताराम मदेशिया, ब्रिजेश बाळू यादव, सोनम बाबू शेख, सलमा शकील शेख, सानिया बाबुमिया शेख आणि रुमा ब्रिजेश मदेशिया यांना ३१ ऑगस्ट रोजी अटक केली.

पोलीस कोठडीतील चौकशीत आरोपींनी पिंपरी पोलीस ठाण्यातील गुन्हा क्रमांक ६४७/२०२६ आणि चिखली पोलीस ठाण्यातील गुन्हा क्रमांक ५९७/२०२६ मधील चोरीची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. याशिवाय काटे पिंपळे, केसनंद फाटा आणि वाघोली परिसरातील स्टार बाजारमध्येही काजू, बदाम व तुपाचे पाऊच चोरल्याची कबुली आरोपींनी दिली आहे.

ही टोळी पुणे, पिंपरी-चिंचवड, मुंबई आणि राज्यातील इतर भागांत अशाच प्रकारचे गुन्हे करत असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून, पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक श्रीनिवास दराडे करीत आहेत.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories