दान करण्याचा बहाणा करून ज्येष्ठ नागरिकाची सोन्याची अंगठी लंपास

दान करण्याचा बहाणा करून ज्येष्ठ नागरिकाची सोन्याची अंगठी लंपास

वाकड | 10 सप्टेंबर 2026 : मंदिराला दान करण्याचा बहाणा करून एका 82 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची 75 हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी हातचलाखीने काढून नेल्याचा प्रकार भूमकर चौक परिसरात घडला. अनोळखी व्यक्तीविरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विठ्ठल केशव धवणे (वय 82, रा. मारुंजी रोड, भूमकर चौक, वाकड) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. ही घटना 8 सप्टेंबर रोजी सकाळी 11:30 ते दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास भूमकर चौकात घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या उजव्या हातात सोन्याच्या दोन अंगठ्या होत्या. त्यावेळी अंदाजे 40 ते 45 वर्षांचा अनोळखी व्यक्ती त्यांच्याजवळ आला. संबंधित व्यक्तीने “रामाचे मंदिर कोठे आहे?” अशी विचारणा करून संवाद सुरू केला.

यानंतर “तुमच्या हाताने दान करायचे आहे,” असे सांगत आरोपीने फिर्यादीच्या हातावर 500 रुपयांची नोट ठेवली. नोट देण्याच्या बहाण्याने हातचलाखी करत आणि फिर्यादीची नजर चुकवत त्याने एका बोटातील सोन्याची अंगठी काढून घेतल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

आरोपी घटनास्थळावरून निघून गेल्यानंतर हातातील अंगठी दिसत नसल्याचे फिर्यादीच्या लक्षात आले. परिसरात शोध घेतल्यानंतरही संबंधित व्यक्ती अथवा अंगठी सापडली नाही. चोरीला गेलेल्या अंगठीची किंमत अंदाजे 75 हजार रुपये असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

आरोपीचे वय अंदाजे 40 ते 45 वर्षे असून, शरीराने मजबूत आणि अंगात काळपट रंगाचा अर्ध्या बाह्यांचा शर्ट होता, असे वर्णन फिर्यादीने पोलिसांना दिले आहे. याप्रकरणी 9 सप्टेंबर रोजी रात्री 9:41 वाजता हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 687/2026 नोंदवण्यात आला. भारतीय न्याय संहितेच्या कलम 318(4) अंतर्गत पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories