गिरिप्रेमी संस्थेची माऊंट एव्हरेस्ट मोहीम २ एप्रिलपासून सुरु होणार
पिंपरी, ता. २३ - पुण्यातील 'गिरिप्रेमी' गिर्यारोहण संस्थेचे गिर्यारोहक येत्या २ एप्रिलला माऊंट एवरेस्ट मोहिमेसाठी निघणार आहेत. एकूण ५० दिवसांची ही गिर्यारोहण मोहिम तेनझिंग नॉर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्कार विजेते ज्येष्ठ गिर्यारोहक उमेश झिरपे यांच्या नेतृत्वाखाली पार पडणार आहे. चढाई संघात गिर्यारोहक विवेक शिवदे, निकुंज शहा, अखिल काटकर व मिहिर जाधव यांचा समावेश आहे.
अनुभवी उच्च हिमालयीन गिर्यारोहक आणि नव्या पिढीतील सक्षम गिर्यारोहक असा हा समतोल संघ माऊंट एवरेस्ट मोहिमेसाठी जात आहे. भारत सरकारच्या सशक्त भारत अभियानाला हातभार लावणारी ही मोहिम असून सर्वांनाच शारिरीक व मानसिक तंदुरुस्तीचा संदेश देणारी आहे. हिमनद्या संवर्धन आणि हवामान बदलाबाबत जनजागृती हा या मोहिमेचा महत्त्वाचा भाग आहे. हिमालयातील हिमनद्यांची स्थिती, हवामान बदलाचे परिणाम आणि जबाबदार गिर्यारोहण या विषयांवर आधारित एक विशेष प्रदर्शन काठमांडू बेस कॅम्पकडे जाणाऱ्या मार्गावर तसेच एव्हरेस्ट बेस कॅम्प या ठिकाणी असेल, अशी माहिती गिरीप्रेमी संस्थेचे संस्थापक उमेश झिरपे यांनी दिली.
सन २०१२ मध्ये संस्थेने भारतातील सर्वात मोठी नागरी एव्हरेस्ट मोहिम यशस्वीरीत्या पार पाडली होती. यामध्ये, आठ गिर्यारोहकांनी एकाच दिवशी शिखरमाथा गाठण्याची दुर्मीळ आणि ऐतिहासिक कामगिरी केली होती. चौदा वर्षांनंतर ही नवी मोहीम त्या परंपरेचा पुढचा टप्पा आहे. सन १९५३ मध्ये तेनसिंग नॉर्गे आणि सर एडमंड हिलरी यांनी प्रथम यशस्वी चढाई केलेल्या नेपाळमधील पारंपरिक साऊथ कोल मार्गाने एव्हरेस्ट सर करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. गेली दोन वर्षे हा संघ या मोहिमेसाठी अत्यंत नियोजनबद्ध तयारी करत आहे, असे झिरपे यांनी सांगितले. चढाई संघातील सदस्यांविषयी माहिती - विवेक शिवदे हे कांचनजुंगा शिखर सर करणारे
अनुभवी उच्च हिमालयीन गिर्यारोहक असून ८ हजार मीटरवरील अनुभवामुळे ते संघासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. निकुंज शहा हे गढवाल हिमालयातील माऊंट थेलू शिखराचे यशस्वी गिर्यारोहक असून शिस्तबद्ध तयारी आणि नियोजनक्षमतेसाठी ओळखले जातात. अखिल काटकर यांनीही माऊंट थेलू शिखर सर केले असून प्रतिकूल परिस्थितीत सातत्यपूर्ण कामगिरी करण्याची क्षमता त्यांची जमेची बाजू आहे. मिहिर जाधव हे नव्या पिढीचे प्रतिनिधित्व करणारे गिर्यारोहक असून गार्डियन गिरिप्रेमी इन्स्टिट्यूट ऑफ माऊंटेनियरिंगच्या डिप्लोमा इन माऊंटेनियरिंग अभ्यासक्रमाच्या पहिल्या तुकडीतील विद्यार्थी आहेत.
---------------------------------------------------------------------------------------