हिंजवडीतील कंपनीकडून कामगारांची ११ लाख २५ हजार रुपयांची फसवूणक
पिंपरी, ता. २ - कंपनीतील काही कामगारांकडून पैसे घेऊन तसेच काम करुन घेऊन त्यांना पगार बुडवून त्यांची ११ लाख २५ हजार रुपयांची फसवूणक केली आहे. हा प्रकार सप्टेंबर २०२५ ते जून २०२६ पर्यंत गेरा इंपेरिअम राईज, १० वा मजला, १०४१, विप्रो सर्कल हिंजवडी, फेज २ येथे घडला आहे.
याबाबत, सौरव राजन नायर (वय २५ वर्षे, शिक्षण, रा. देहुरोड) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, आरोपी असलेले कंपनीचे सीईओ हर्षल भानुदास ठाकरे, ट्रेनिंग अँण्ड डेव्हलपमेंट हेड ध्रुविल पारेख, एच आर सौम्या सिंग व थिंक टेक टेक्नॉलॉजी प्रा.लि. सदर कंपनीतील इतर संबधितांवर हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपींनी आपआपसात संगनमत करुन फिर्यादी सौरव नायर व साक्षीदारांकडून कंपनीच्या खात्यावर पैसे घेऊन त्यांना ट्रेनिंग दिले. त्यांच्याकडून काम करुन घेऊन लगेच वेगवेगळी कारणे देऊन त्यांचा विश्वासघात करुन त्यांना २ पगार दिला नाही. प्रत्येकाकडून प्रत्येकी १५,००० रुपये व कामगारांनी २ महिने केलेल्या कामाचा पगार असे एकूण ११,२५,०००/- रुपये न देता ती रक्कम स्वतःसाठी वापरुन आरोपींनी कामगारांची फसवणूक केलेली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
आरोपींवर हिंजवडी पोलिस ठाण्यात सोमवारी (ता. १) भारतीय न्याय संहिता कलम ३१६ (२), ३१८(४), ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.