भारतीय हवाई दलाच्या 'सुखोई' या लढाऊ विमानाच्या अपघातात भारतमातेचे दोन सुपुत्र शहीद
पुणे, ता. ६ - भारतीय हवाई दलाचे सुखोई - Su-30MKI हे लढाऊ विमान आसाममधील कार्बी आंगलोंग जिल्ह्यात प्रशिक्षण मोहिमेदरम्यान दुर्घटनाग्रस्त झाले. या अपघातात स्क्वॉड्रन लीडर अनुज यादव व महाराष्ट्राचे सुपुत्र फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुरगकर शहीद झाले.
हवाई दलाने आज, शुक्रवारी (ता. ६) पहाटे अपघाताचे वृत्त जाहीर करुन, नंतर सकाळी सव्वा नऊच्या सुमारास दोन्ही वैमानिकांच्या निधनाची अधिकृत माहिती दिली.
हवाई दलाने दिलेल्या माहितीनुसार, 'भारतीय हवाई दलाचे हे विमान जोरहाट एअरबेसवरून उड्डाण केल्यानंतर सुमारे ७.४२ वाजता रडारवरुन गायब झाले होते. सुमारे ६० किमी अंतरावर (जोरहाटपासून) कार्बी आंगलोंगच्या डोंगराळ भागात विमान कोसळले. विमान नियमित प्रशिक्षण उड्डाणावर होते. उड्डाणानंतर लगेच ग्राउंड कंट्रोलशी संपर्क तुटला. स्थानिक रहिवाशांनी जोरदार स्फोट आणि काळा धूर पाहिल्याची माहिती केली. शोध आणि बचाव मोहीम (Search and Rescue) ताबडतोब सुरु करण्यात आली. हवाई दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. या विमानाच्या अपघाताची चौकशी सुरु आहे.'
स्क्वॉड्रन लीडर अनुज यादव आणि फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुरगकर हे दोघेही धाडसी वैमानिक होते. पूर्वेश दुरगकर हे भंडारा जिल्ह्यातील रहिवासी होते. भारतीय हवाई दलाने शोक व्यक्त केला असून आहे. शहीद वैमानिकांच्या कुटुंबाचे सांत्वन केले आहे. 'सुखोई Su-30MKI' हे भारतीय हवाई दलाचे सर्वात प्रगत बहुउद्देशीय लढाऊ विमान आहे. दोन इंजिन असलेले हे विमान हवाई संरक्षण, लांब पल्ल्याचे हल्ले आणि देखरेखीसाठी वापरले जाते. हे विमान भारतीय हवाई दलातील प्रमुख विमान आहे.