खेड तालुक्यात घरगुती गॅस सिलिंडरचे बेकायदेशीर रिफिलिंग, युवकावर गुन्हा
पिंपरी, ता. २६ - घरगुती गॅस सिलेंडरमधील गॅस मोकळ्या सिलेंडरमध्ये भरत असल्याचा प्रकार बुधवारी (ता. २५) समोर आला. हा प्रकार खेड तालुक्यातील सावरदरी येथील ओम साई गॅस सर्विस दुकानामध्ये घडला आहे. याबाबत २४ वर्षीय युवकाविरुद्ध उत्तर महाळुंगे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी सुमारे ७.४० वाजण्याच्या सुमारास सावरदरी (ता. खेड, जि. पुणे) येथील ओम साई गॅस सर्विस या दुकानात आरोपी राजेश महादेव सातपुते (वय २४, रा. सावरदरी) हा घरगुती भरलेल्या सिलेंडरमधील गॅस मोकळ्या सिलेंडरमध्ये भरत असताना आढळून आला.
ज्वालाग्राही पदार्थांबाबत आवश्यक सुरक्षा उपाययोजना न करता हा प्रकार सुरु होता.
आरोपीने घरगुती गॅस या जीवनावश्यक वस्तूबाबत शासन व ग्राहकांची फसवणूक केल्याबद्दल त्याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ३१८ (४), २८७, २८८ तसेच जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५ आणि (पुरवठा व वितरण नियमन) आदेश २००० मधील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीस अद्याप अटक करण्यात आलेली नाही.