news
clock
देशविघातक शक्तींची कारस्थाने उधळून 'आयआयएम' संस्थेचे योगदान मोलाचे - के. के. पांडे

देशविघातक शक्तींची कारस्थाने उधळून 'आयआयएम' संस्थेचे योगदान मोलाचे - के. के. पांडे

देशविघातक शक्तींची कारस्थाने उधळून 'आयआयएम' संस्थेचे योगदान मोलाचे - के. के. पांडे

पुणे, ता. २ - ''देशात मोठी जिवितहानी घडवून आणण्याच्या देशविघातक शक्तींची कारस्थाने उधळून लावत, केंद्रीय राखीव पोलिस दलाने (सीआरपीएफ) २०२५ या वर्षात तब्बल सहा हजार ५१० किलो स्फोटके आणि ७६७ 'आयईडी' (इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोसिव्ह डिव्हाईस) जप्त करण्याची ऐतिहासिक कामगिरी केली आहे. या कारवाईमुळे देशावरील मोठे संकट टळले असून, अनेकांचे प्राण वाचले आहेत. या यशामागे सुरक्षा दलांना 'आयईडी' निकामी करण्याचे अद्ययावत प्रशिक्षण देणाऱ्या पुण्यातील 'इन्स्टिट्यूट ऑफ आयईडी मॅनेजमेंट' (आयआयएम) या संस्थेचे मोलाचे योगदान आहे.'' 'इन्स्टिट्यूट ऑफ आयईडी मॅनेजमेंट'चे महासंचालक व प्राचार्य के. के. पांडे यांनी सांगितले.

'पुणे श्रमिक पत्रकार संघा'तर्फे 'इन्स्टिट्यूट ऑफ आयईडी मॅनेजमेंट' येथे अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना के. के. पांडे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. संस्थेच्या वाटचालीविषयी सांगताना पांडे म्हणाले, ''२०१२ मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेने गेल्या १४ वर्षांत आपली क्षमता लक्षणीयरीत्या वाढवली आहे. आतापर्यंत १२ हजार ५५३ हून अधिक अधिकारी आणि जवानांना येथे प्रशिक्षित करण्यात आले आहे. त्यामध्ये विविध राज्यांचे पोलिस दल, केंद्रीय सशस्त्र पोलिस दल (सीएपीएफ), विशेष कृती दल आणि मित्र राष्ट्र यांचा समावेश आहे.''

पुढ ते म्हणाले, ''संस्थेची क्षमता वाढल्याने जवानांचे 'आयईडी' शोधण्याचे आणि ते निकामी करण्याचे कौशल्य वाढले  असल्याने घातपाताच्या घटनांमध्ये मोठी घट झाली आहे. याच कामगिरीची दखल घेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते संस्थेला 'सीआरपीएफ'ची 'सर्वोत्कृष्ट प्रशिक्षण संस्था' म्हणून गौरविण्यात आले. प्रशिक्षणामध्ये आता कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करण्यावर भर दिला जाणार आहे. विशेषतः पावसाळ्यात किंवा प्रतिकूल हवामानात जवानांना प्रत्यक्ष मैदानी प्रशिक्षण देणे कठीण जाते. अशा वेळी 'एआय'च्या माध्यमातून आभासी स्वरूपात प्रशिक्षण दिले जाईल."

"सध्या तंत्रज्ञान कितीही प्रगत झाले असले, तरी प्रत्यक्ष युद्धभूमीवर मानवी निरीक्षण हेच 'आयईडी' शोधण्यात सर्वात कळीचा मुद्दा ठरतो. केवळ उपकरणांवर अवलंबून न राहता जवान स्वतःचे निरीक्षण आणि उपकरणांची जोड यांची सांगड घालून मोहिमा फत्ते करत आहेत. भविष्यात 'मेक इन इंडिया'ला चालना देत 'डीआरडीओ'च्या मदतीने स्वदेशी उपकरणांच्या निर्मितीसाठी संशोधन सुरू आहे," असे के. के. पांडे यांनी सांगितले.


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories