कर्नाटकात मराठी भाषा-संस्कृतीशी असलेले नाते होतेय अधिक घट्ट,
मराठी माणसांनी स्थापन केलेय 'बंगळुरु मराठी प्रतिष्ठान'
पुणे, ता. २७ - मायमराठीशी असलेलं अतूट नातं अधिक घट्ट करण्यासाठी कर्नाटकातील मराठी माणसांनी एकत्र येऊन सुरु केलेले 'बंगळुरु मराठी प्रतिष्ठान' कार्यरत आहे. हे मंडळ मराठी संस्कृती, साहित्य आणि शिक्षणाशी संबंधित विविध उपक्रम राबवत आहे. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त जाणून घेऊया या मंडळाविषयी.
सन २०१७ मध्ये 'बंगळुरु मराठी प्रतिष्ठान'ची स्थापना झाली. लोक नोकरी-व्यवसायानिमित्त आपले गाव सोडून दुसरीकडे जातात तेव्हा तेथील भाषेशी व संस्कृतीशी जुळवून घेताना आपल्या मातृभाषेची आठवण येतच राहते. म्हणून, मराठी भाषेशी असलेले नाते बंगळुरुमध्येही अबाधित राहावे आणि दृढ व्हावे, यासाठी बंगळुरुमध्ये स्थलांतरीत झालेल्या मराठी भाषिकांनी या मराठी प्रतिष्ठानची स्थापना केली.
बंगळुरु मराठी प्रतिष्ठानच्या माध्यमातून मराठी भाषा व संस्कृती जपणारे अनेक उपक्रम राबवले जात आहेत.
कोरोना काळात सन २०२० मध्ये प्रतिष्ठानने 'ओळख मायबोलीची' हा ऑनलाईन मराठी शाळेचा उपक्रम राबवला. बापूसाहेब शिंदे यांच्या संकल्पनेतून सुरु झालेला हा उपक्रम देशभरात आणि जपान, अमेरिका, सौदी अरेबिया, फिनलंड आणि जर्मनीपर्यंत गेला आहे. आजपर्यंत १२०० हून अधिक विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचा लाभ घेतला. या मराठी शाळेमध्ये, बृहनमहाराष्ट्र मंडळ, नवी दिल्ली आणि राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांच्यातर्फे घेतल्या जाणाऱ्या परीक्षांची तयारी करुन घेतली जाते. ही शाळा विनाशुल्क आहे. शिक्षकही उत्स्फूर्तपणे विनामोबदला काम करतात. अनेकांना मराठी भाषा शिकवण्यासाठी प्रतिष्ठानने घेतलेला पुढाकार अतिशय कौतुकास्पद आहे.
सांस्कृतिक आणि क्रीडा उपक्रमांबरोबरच मंडळ सामाजिक कार्यातही सक्रिय आहे. सन २०१९ साली आलेल्या महापुराच्या वेळी बेळगाव, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील गावांमध्ये लोकवर्गणीतून मदत देण्यात आली.
मंडळाचे अध्यक्ष बापूसाहेब शिंदे, सहकारी आणि शिक्षक स्मिता बर्वे, स्मिता ढोले, संजिवनी अहेरराव, स्नेहा बर्वे, संपदा सावे, सुखदा राव, अनुराधा बोरसे, स्वप्निल अमृतकर, मनाली जोशी आणि अंजनी राणे प्रतिष्ठानच्या उपक्रमांमध्ये आपला भरीव वाटा देत आहेत.