किवळे येथे बांधकाम साईटवर उंचावरुन पडून मजूराचा मृत्यू
पिंपरी, ता. ४ - किवळे, ता. हवेली पुणे येथील सीएमएस स्कूलच्या कन्स्ट्रक्शन साइटवर सुरक्षा नियमांचे पालन न केल्यामुळे तिसऱ्या मजल्यावरून एक मजूर खाली पडून मृत्यू पावला. ही घटना दि. ०३ जून २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास घडली.
फिर्यादी अजमत नजरुल खान (वय २२) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपींनी सुरक्षा साधने (सेफ्टी नेट, सेफ्टी बेल्ट, हेल्मेट, जॅकेट, रस्सी किंवा शिडी) उपलब्ध न करता काम करताना इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर सेफ्टी नेटचे काम करण्यास सांगितले. यामुळे फिर्यादी आणि त्याचा सहकारी सनी शेख काम करत असताना, सनी शेखचा तोल गेला व तो खाली पडून मानेवर व डोक्यावर गंभीर जखमा होऊन जागीच ठार झाला.
या घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई केली असून, आरोपींमध्ये राहुल दुधनाथ महतो (वय २१), सय्यद रफिकुल हुसेन अली (वय ३२), सागर विनोद सावंत (वय ५०) आणि प्रशांत खोजे यांचा समावेश आहे. त्यापैकी राहुल, सय्यद आणि सागर यांना अटक करण्यात आली आहे.