ओळख न दाखवल्याच्या कारणावरुन चार मित्रांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करत सुऱ्याने वार
पिंपरी, ता. ३ - तोंड ओळखीच्या युवकाला ओळख न दाखवल्याच्या कारणावरुन तीन जणांनी चार मित्रांना शिविगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व सुऱ्याने वार करुन जखमी केले. ही घटना सोमवारी (ता. २) जुनी सांगवी परिसरात घडली आहे. आरोपींवर सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत, रोहित दिगंबर कांबळे (वय ३६ वर्षे, व्यवसाय, जुनी सांगवी) यांनी तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या मारहाणीच्या घटनेत अक्षय उर्फ जोग्या हेमंत जाधव, अक्षय (बब्या) जावळे व अर्जुन देवकांबळे हे आरोपी आहेत.
फिर्यादी रोहित व त्यांचे मित्र रयान रुसबेइराणी, अभिलाश रामचंद्रणनायर, अजिंक्य सुतार, मनिष गुरुंग हे सोमवारी मध्यरात्री जुनी सांगवी येथील गणपती मंदिराजवळ (ममता नगर) गप्पा मारत थांबले होते. त्यावेळी फिर्यादी रोहितच्या तोंड ओळखीच्या आरोपींनी दुचाकीवरुन तिथे येत रयान याला ''तू आम्हाला ओळखतो का ?'' असे विचारले. रयान याने ''मी तुम्हाला ओळखत नाही.'' असे म्हटल्याच्या कारणावरुन आम्हाला शिवीगाळ व लाथाबुक्यांनी मारहाण करुन तिन्ही आरोपींनी सोबत आणलेल्या सुऱ्याने त्या मित्रांना जिवे ठार मारण्याच्या त्यांच्यावर उद्देशाने वार करुन त्यांना गंभीर जखमी केले. पोलीसांत तक्रार केली तर ''तुमच्याकडे बघून घेईल'' असे म्हणत सुरा हवेत फिरवत जोर-जोरात ओरडत परिसरात दहशत करत तेथून निघून गेले.
आरोपींना अद्याप अटक करण्यात आली नाही. त्यांच्याविरोधात सांगवी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता - २०२३ चे कलम १०९, ११५ (२), ३५२, ३५१ (२), ३ (५), सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३),१३५, सह क्रिमीनल लॉ अमेडमेंट कलम ३,७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.