अनेकविध उपक्रमांनी सीमेवरच्या गावांत घुमला मराठीचा जयघोष
पिंपरी, ता. ११ - मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून पुण्यातील मराठवाडा जनविकास संघ व बिदर येथील शारदा प्रतिष्ठान भालकी यांच्या संयुक्त विद्यमाने भालकी तालुक्यातील (जि. बिदर) अट्टरगा, गुंजरगा, माणकेश्वर आणि बसवनवाडी येथील सहकारी प्राथमिक शाळांमध्ये अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात ऐतिहासिक आणि ज्ञानरुपी उपक्रम नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला.
'अभिमान मराठीचा, उत्सव मराठी भाषेचा...!' या ब्रीदवाक्याला सार्थ ठरवत, सीमावर्ती भागातील मराठी शाळांना आणि शिक्षकांना त्यांच्या अमूल्य योगदानाबद्दल 'सन्मान चिन्ह' देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमात, मराठी भाषेचे महत्त्व आणि संवर्धन या विषयावर प्रबोधनात्मक व्याख्यान झाले, सीमेवरच्या गावांत मराठी भाषा टिकवण्यासाठी काम करणाऱ्या शाळांचा गौरव करण्यात आला तसेच विद्यार्थ्यांमध्ये मराठी साहित्याबद्दल जनजागृती करण्यात आली. शाळांना भारतीय संविधान, ज्ञानेश्वरी, संत तुकाराम महाराजांची गाथा तसेच शैक्षणिक साहित्य देऊन सन्मानित करण्यात आले.
''मराठी आपली मायबोली आहे आणि ती सातासमुद्रापार नेण्यासोबतच आपल्या शेजारील राज्यांतील सीमावर्ती भागात ती जिवंत ठेवणे हे आपले कर्तव्य आहे. हा छोटासा प्रयत्न त्याच संकल्पाचा एक भाग आहे!
सहकार्य करणाऱ्या सर्व ग्रामस्थांचे, शाळा व्यवस्थापनाचे आणि उपस्थित मराठी प्रेमींचे मनःपूर्वक आभार!''
अशी भावना मराठवाडा जनविकास संघाचे संस्थापक, अध्यक्ष अरुण श्रीपती पवार यांनी व्यक्त केली.
यावेळी, बब्रुवाहन वाघ महाराज, सूर्यकांत कुरुलकर, दत्तात्रय धोंडगे, प्रा. रविंद्र खांडेकर, सुधाकर थिटे, किशोर अट्टर्गेकर, तुकाराम नारायणराव मोरे, हरिदेव रुद्रमणी, तुकाराम शेडोळे, अमृत अक्रे आणि इतर सहकारी उपस्थित होते.