पिंपरीत मारुती बलेनोसह सोने व रोख रक्कम चोरी; दोघांविरुद्ध गुन्हा
पिंपरी, ता. २० - पिंपळे सौदागर येथील पुष्पकुंज इमारतीजवळी पार्किंगमधून फिर्यादी मनोज सोनकर यांची मारुती बलेनो गाडी चोरी झाली. ही घटना १० डिसेंबर २०२४ रोजी दुपारी ११ ते सायंकाळी ५ वाजेच्या दरम्यान घडली. या प्रकरणी आरोपीविरोधात शुक्रवारी (ता. २०) सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. गाडीत तब्बल ५ लाख ५० हजार रुपये किंमतीचे सोने आणि रोख रक्कम ठेवली होती.
मनोज रुपनारायण सोनकर (वय ३७ वर्षे) यांनी सांगवी पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सोनकर यांनी ५,१५,००० रुपये किंमतीची कार ऋषीकेश संतोष गांधी यांच्या नावावरून खरेदी केली होती. कार पार्किंगमध्ये लॉक करून ठेवली असता, आरोपी ऋषीकेश गांधी आणि संकेत सुरेश नेहरकर यांनी संगनमत करून कार चोरी केली. फिर्यादींच्या परवानगीशिवाय चावी वापरून कार चालू केली आणि घेऊन गेले. फिर्यादींनी कार परत मागितली असता, आरोपींनी फोनवरून शिवीगाळ केली आणि कार परत देण्यास नकार दिला.
सांगवी पोलीस ठाण्यात आरोपी ऋषीकेश गांधी (रा. भोरवाडी, हिवरे बुद्रुक, ता. जुन्नर, जि. पुणे) व संकेत नेहरकर (रा. जोरामळा, येडगाव, ता. जुन्नर, जि. पुणे) यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम ३१८(४), ३१६(२), ३०३(२), ३५१(४), ३(५) प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे.