दिवसा घरफोडी करणाऱ्या महिलेला अटक, ८ लाखांचे सोन्याचे दागिने जप्त
पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट - १ ची कामगिरी
पिंपरी, ता. १० - सांगवी परिसरातून पाच लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने घरातून चोरी झाल्याची घटनेत अज्ञात आरोपीविरोधात २५ फेब्रुवारी २०२६ रोजी गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याच्या तपासात महिलेने ही चोरी केल्याचे समोर आले आहे. सीसीटिव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी तपास केला. वारजे माळवाडी येथून महिलेला अटक करुन तिच्याकडून ८ लाखांचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. तपासात आणखी दोन गुन्ह्यांची उकल झाली आहे.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत दाखल होणाऱ्या घरफोडीच्या गुन्ह्यांच्या अनुषंगाने सांगवी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०५ (अ), ३३१ (३) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादी यांच्या घरातून सुमारे पाच लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने २५ फेब्रुवारी २०२६ रोजी चोरी केल्याची तक्रार होती.
पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सहपोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) डॉ. शिवाजी पवार आणि सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट - १ चे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेंद्र ठाकरे यांच्या पथकाने तपास सुरु केला.
तपासामध्ये सांगवी ते वारजे माळवाडी परिसरातील सुमारे २०० ते २५० हून अधिक सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करण्यात आली. त्यातून ही घरफोडी एका महिलेने केल्याचे निष्पन्न झाले. सीसीटीव्ही फुटेजचे तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे सुमन दत्ता लोंढे (वय ३५, रा. सर्वे नं. ३५/३६, अचानक चौक, रामनगर, वारजे माळवाडी, पुणे) हिला ताब्यात घेण्यात आले. तिला अटक करून पोलिस कोठडी रिमांड घेतली असता तिच्याकडून चोरी केलेले सुमारे ८ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. अधिक चौकशीत तिने यापूर्वीही दिवसा घरफोडी केल्याची कबुली दिली. त्यानुसार सांगवी पोलीस ठाण्यात आणखी एक गुन्हा उघडकीस आला असून एकूण दोन गुन्ह्यांचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे.
तपासात आरोपी महिला घरमालक बाहेरगावी जाताना घराच्या बाहेर चावी ठेवतात, यावर लक्ष ठेवून चावी शोधून घरफोडी करत असल्याचे समोर आले. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेंद्र ठाकरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुळीग, पोलीस उपनिरीक्षक कर्मराज गावडे, संतोष इंगळे, महिला पोलीस हवालदार उषा दळे, महादेव जावळे, शिवराम भोपे, अजय डगळे, जयवंत राऊत, देवा राऊत, विजय शेळकंदे, दीपक तांदळे, तेजस भालचिम, संदेश देशमुख, खेडकर व इतर कर्मचाऱ्यांच्या पथकाने केली.