पिंपरी-चिंचवड, दि. 8 सप्टेंबर 2026 : निगडी प्राधिकरण येथील महानगरपालिकेच्या मोकळ्या भूखंडावर प्रस्तावित असलेले महापौर निवासस्थान शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी उभारावे, अशी आग्रही मागणी भक्ती-शक्ती शिवजयंती उत्सव समिती आणि शहरातील शिवप्रेमी संघटनांनी केली आहे. या मागणीसाठी महापौर रवि लांडगे, महापालिका आयुक्त विजय सूर्यवंशी, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर आणि शहर अभियंता मनोज सेठिया यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन देण्यात आले. मागणी मान्य न झाल्यास आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
निगडी प्राधिकरणातील संबंधित भूखंडावर महापौर निवासस्थान बांधण्यासाठी नुकत्याच झालेल्या महापालिका आणि स्थायी समितीच्या सभेत 5 कोटी रुपये खर्चास मान्यता देण्यात आली आहे. मात्र, या जागेवर गेल्या अनेक वर्षांपासून भक्ती-शक्ती शिवजयंती महोत्सव समिती आणि महापालिकेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त भव्य कार्यक्रम, महानाट्य तसेच विविध सांस्कृतिक उपक्रम आयोजित केले जातात.
याशिवाय या ठिकाणी विविध महापुरुषांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम आणि सार्वजनिक उपक्रमही होत असतात. भक्ती-शक्ती समूहशिल्पाजवळ सार्वजनिक कार्यक्रमांसाठी उपलब्ध असलेली ही एकमेव जागा असल्याचा दावा शिवप्रेमी संघटनांनी केला आहे. त्यामुळे सदर भूखंड सार्वजनिक आणि सांस्कृतिक उपक्रमांसाठी राखून ठेवावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
महापौर निवासस्थानासाठी शहरातील मध्यवर्ती ठिकाणी पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. मागणीचा सकारात्मक विचार न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनांनी दिला आहे.
यावेळी मारुती भापकर, सचिन चिखले, चेतन पवार, प्रकाश जाधव, काशिनाथ नखाते, रोहिदास शिवणेकर, हौशेराव शिंदे, प्रबुद्ध कांबळे, सतीश काळे, वैभव जाधव, वसंत पाटील, सखाराम इक्के, आबासाहेब ढवळे आदी उपस्थित होते.