समाज विकास विभागाच्या विविध कल्याणकारी योजनांच्या अर्ज स्वीकृती प्रक्रियेचा महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते शुभारंभ

समाज विकास विभागाच्या विविध कल्याणकारी योजनांच्या अर्ज स्वीकृती प्रक्रियेचा महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते शुभारंभ

पिंपरी, दि. 8 सप्टेंबर 2026 : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या समाज विकास विभागामार्फत सन 2026-27 या आर्थिक वर्षात राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांच्या अर्ज स्वीकृती प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते या प्रक्रियेचा शुभारंभ करण्यात आला.

महिला, बालके, दिव्यांग व्यक्ती, मागासवर्गीय तसेच गरजू व वंचित घटकांतील पात्र लाभार्थ्यांना योजनांचा लाभ सुलभपणे मिळावा, यासाठी अर्ज प्रक्रिया नागरिकाभिमुख करण्यावर भर देण्यात आला आहे. योजनांची माहिती पात्र नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविणे, अर्ज प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करणे आणि पात्र लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ मिळवून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.

अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्याबरोबरच आवश्यकतेनुसार ऑफलाईन अर्जाची सुविधाही उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. डिजिटल माध्यमांचा वापर करताना अडचणी येणारे नागरिक, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींना अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आवश्यक सहाय्य उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले.

अर्जातील त्रुटी किंवा तांत्रिक अडचणींमुळे पात्र लाभार्थी योजनांपासून वंचित राहू नयेत, तसेच नागरिकांना अर्जासाठी वारंवार महापालिका कार्यालयात येण्याची वेळ येऊ नये, यासाठी आवश्यक प्रशासकीय व्यवस्था करण्यावरही भर देण्यात आला.

महापौर रवि लांडगे म्हणाले, “माहितीचा अभाव, तांत्रिक अडचणी किंवा अर्ज प्रक्रियेतील अडथळ्यांमुळे कोणताही पात्र नागरिक लाभापासून वंचित राहू नये. अर्ज प्रक्रिया सुलभ व पारदर्शक ठेवून पात्र लाभार्थ्यांना वेळेत योजनांचा लाभ देण्यास प्राधान्य द्यावे.”

महिला व बालकल्याण समितीच्या माध्यमातून महिला व बालकांसाठीच्या योजनांची जनजागृती आणि प्रभावी अंमलबजावणी करण्यावरही भर देण्यात येणार आहे, अशी माहिती सभापती राणी पठारे यांनी दिली.

यावेळी उपमहापौर शर्मिला बाबर, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती राणी पठारे, समिती सदस्या, अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे, उपायुक्त ममता शिंदे, समाज विकास विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

पात्र नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह विहित मुदतीत अर्ज साद करून महापालिकेच्या कल्याणकारी योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories