गणेश विसर्जन घाटांची महापौर रवि लांडगे आणि आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडून पाहणी
पिंपरी-चिंचवड | 12 सप्टेंबर 2026 : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील गणेश विसर्जन घाटांवर करण्यात येणाऱ्या व्यवस्थेचा महापौर रवि लांडगे आणि महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी प्रत्यक्ष पाहणी करून आढावा घेतला. विसर्जनासाठी येणाऱ्या गणेशभक्तांना कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी आवश्यक सुविधा तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
या पाहणी दौऱ्यात चिंचवड-थेरगाव पूल घाट, जाधववाडी घाट, मोशी येथील इंद्रायणी नदी घाट तसेच मोशी खाण परिसरातील विसर्जन व्यवस्थेची तपासणी करण्यात आली. घाट परिसरातील स्वच्छता, नागरिकांची सुरक्षितता, प्रकाशव्यवस्था आणि भाविकांच्या येण्या-जाण्यासाठी उपलब्ध असलेल्या सुविधांचा आढावा घेण्यात आला.
गणेशमूर्ती विसर्जनासाठी मोठ्या संख्येने नागरिक घाटांवर येण्याची शक्यता लक्षात घेऊन गर्दीचे योग्य नियोजन करण्यावर भर देण्यात आला. विसर्जन घाटांवरील प्रवेश आणि बाहेर पडण्याचे मार्ग सुरक्षित ठेवणे, आवश्यक ठिकाणी पुरेशी प्रकाशव्यवस्था करणे तसेच घाट परिसर नियमितपणे स्वच्छ ठेवण्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या.
संपूर्ण विसर्जन प्रक्रिया सुरक्षित, शिस्तबद्ध आणि पर्यावरणपूरक पद्धतीने पार पडावी, यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देशही देण्यात आले. आवश्यक कामे आणि सुविधांची उभारणी निर्धारित वेळेत पूर्ण करून विसर्जन काळात यंत्रणा सतर्क ठेवण्यास सांगण्यात आले.
या पाहणीवेळी आमदार उमा खापरे, नगरसदस्य सुरेश भोईर, मंदार देशपांडे, शेखर चिंचवडे, निलेश तरस, ऐश्वर्या तरस, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, तृप्ती सांडभोर आणि विक्रांत बगाडे उपस्थित होते. संबंधित क्षेत्रीय कार्यालयांचे अधिकारी आणि कर्मचारीही या दौऱ्यात सहभागी झाले होते.
गणेशभक्तांनी प्रशासनाने निश्चित केलेल्या सूचनांचे पालन करून विसर्जन प्रक्रिया शांततापूर्ण आणि पर्यावरणपूरक पद्धतीने पूर्ण करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.