शहराला अधिक सक्षम, सुजलाम-सुफलाम आणि प्रगत बनविण्याचा आमचा संकल्प - महापौर रवी लांडगे
महिनाभरातील कामांची पत्रकार परिषदेत माहिती
पिंपरी, ता. ६ - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे महापौर म्हणून पदभार स्वीकारून महिना पूर्ण झाला असून या तीस दिवसांत शहराच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण कामांचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती महापौर रवी लांडगे यांनी आज, शुक्रवारी (ता. ६) पत्रकार परिषदेत दिली.
एका महिन्यात शहराच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस निर्णय घेत पर्यावरण, आरोग्य, शिक्षण, वैद्यकीय सेवा आणि पाणीपुरवठा या महत्त्वाच्या विषयांवर प्रशासनाला स्पष्ट दिशा देण्यात आली. याबाबत सविस्तर माहिती देताना, पहिल्याच सर्वसाधारण सभेत नागरिकांच्या हितासाठी ५ महत्त्वपूर्ण सूचना दिल्याचे महापौरांनी सांगितले.
त्यामध्ये मालमत्ता कर अभय योजना,अग्निशमन विभागातील कामकाज वाटप, महिलांना रात्र पाळीत दिलेले काम बंद करणे,भटक्या कुत्र्यांवरील आवश्यक कार्यवाही,
भामा आसखेड पाणीपुरवठा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी जुना ठेकेदार एलिमिनेट करून नवीन ठेकेदाराची नेमणूक करणे या सूचना दिल्याचे महापौरांनी सांगितले.
या निर्णयांनुसार प्रशासनाने तातडीने कार्यवाही करत मालमत्ता कर अभय योजना सुरू केली, अग्निशमन विभागातील कामकाजाचे पुनर्वाटप केले आणि महिलांना रात्रपाळीत दिलेले काम बंद करण्याचा निर्णय अंमलात आणला. तसेच भटक्या कुत्र्यांच्या व्यवस्थापनाबाबत आणि पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी भामा आसखेड प्रकल्पाशी संबंधित कामे प्रगतीपथावर आहेत.
''शहराचा सर्वांगीण विकास, नागरिकांच्या मूलभूत गरजांची पूर्तता आणि प्रशासनात गती व पारदर्शकता आणण्याचा निर्धार याच भूमिकेतून कामकाज सुरु आहे. पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासासाठी जनतेचा विश्वास आणि आशीर्वाद हीच सर्वात मोठी ताकद आहे. हा विश्वास कायम ठेवत शहराला अधिक सक्षम, सुजलाम-सुफलाम आणि प्रगत बनविण्याचा आमचा संकल्प आहे.'', असे महापौर म्हणाले.