पुणे जिल्ह्यात वर्षभरात ६२ मेडिकल्सचे परवान कायमस्वरुपी रद्द, 'एफडीए'ची कडक कारवाई
पिंपरी, ता. २२ - प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधे देणे, कालबाह्य औषधांची विक्री तसेच इतर नियमांचा भंग करणाऱ्या मेडिकल स्टोअर्सवर अन्न व औषध प्रशासन विभागाने (एफडीए) कडक कारवाई केली आहे. गेल्या वर्षभरात पुणे जिल्ह्यात सुमारे ६२ मेडिकल स्टोअर्सचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले, तर ३४२ स्टोअर्सचे परवाने तात्पुरते निलंबित करण्यात आले.
पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत २५०० मेडिकल स्टोअर्स आहेत व ही संख्या वाढत आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मेडिकल्सवर कारवाई केली जात आहे. गेल्या वर्षभरात पुणे जिल्ह्यात ४०४ मेडिकल स्टोअर्सवर कारवाई करण्यात आली आहे. काही मेडिकल स्टोअर्समध्ये नोंदणीकृत फार्मासिस्ट नसतो. परवाना एकाच्या नावाने असतो, पण स्टोअर दुसरा व्यक्ती चालवतो, असे आढळून आले आहे.
तर दुकानांचे परवाने रद्द होतात...'''एफडीए'कडून नियमांचे गंभीर उल्लंघन केल्यास अशा औषधांच्या दुकानांचे परवाने निलंबित किंवा रद्द केले जातात. स्टोअरमध्ये फार्मासिस्ट नसल्याने मोठे धोके निर्माण होऊ शकतात. व्यसनाधीन औषधे, नार्कोटिक्स आणि गर्भपात किट्स प्रिस्क्रिप्शनशिवाय विकणे नियमबाह्य आहे.'' - गिरीश हुकरे, सह आयुक्त (औषध), एफडीए