फुगेवाडीतील मृत्यूंसारख्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये पोलिसांनी स्वतंत्र युनीट स्थापन करावे, अवैध धंद्यांवर कडक कारवाई करावी - खासदार श्रीरंग बारणे
May 29 2026
23
फुगेवाडीतील मृत्यूंसारख्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये पोलिसांनी स्वतंत्र युनीट स्थापन करावे, अवैध धंद्यांवर कडक कारवाई करावी - खासदार श्रीरंग बारणे
पिंपरी, ता. २९ - ''विषारी दारु पिल्याने दापोडीतील फुगेवाडीतील सात जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्देवी आहे. भविष्यात अशी घटना घडू नये यासाठी पोलिसांनी स्वतंत्र युनीट स्थापन करावे. शहरातील अवैध धंद्यांवर व त्यांना प्रोत्साहन देणाऱ्यांवर कडक कारवाई करावी.'', अशी सूचना खासदार श्रीरंग बारणे यांनी पोलिसांना दिली आहे. या मृतांच्या नातेवाईकांना राज्य शासनाने आर्थिक मदत करावी, अशी मागणी खासदार बारणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
खासदार बारणे यांनी शुक्रवारी (ता. २९) दापोडी पोलीस ठाण्यात भेट देऊन सविस्तर माहिती घेतली. पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्याशी संपर्क साधला. पोलिस उपायुक्त संदीप आटोळे, सहायक पोलीस आयुक्त सचिन हिरे, विशाल हिरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय वाघमारे यांच्याकडून घटनेचे सविस्तर माहिती घेतली. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी अधीक्षक अतुल कानडे यावेळी उपस्थित होते.
खासदार बारणे म्हणाले, ''ही गावठी दारु हडपसर येथील लमान तांडा येथे बनवून विविध विभागात पाठवली जात होती. परदेशी नावाच्या व्यक्तीने सिंग, राठोडला दारु दिली. त्यात केमिकल मिसळण्यात आले. त्याचे प्रमाण जास्त असल्याने दारु विषारी झाली. तिचे प्राशन केल्याने पिंपरी-चिंचवडमधील सात जणांचा मृत्यू झाला आहे. तीघे गंभीर जखमी आहेत. पुण्यातील पाच जणांचा मृत्यू झाला आहे. दापोडीतील मृत्यू झालेले नागरिक गरीब, झोपडपट्टीत राहणारे आहेत. स्वस्तामध्ये दारु मिळत असल्याने त्यांच्याकडून घेतली जात असल्याचे दिसते. ''
''पिंपरी-चिंचवड शहर वाढत आहे. शहरात बाहेरील नागरिकही मोठ्या प्रमाणात आले आहेत. काम न करणाऱ्या लोकांकडून अवैध धंदे केले जातात. शहरात अवैध धंदे सुरु आहेत. या धंद्यावर नियंत्रण आणावे. त्यावर कारवाईसाठी स्वतंत्र युनीट निर्माण करावे. यापुढे अशा घटना घडू नयेत, याची खबरदारी घ्यावी. अवैध धंदे, या धंद्यांना प्रोत्साहन देणाऱ्यांवर कडक कारवाई करावी.'' , अशी सूचना खासदार बारणे यांनी पोलिसांना दिली.
- , Economic Aid Demand
- Independent Police Unit, अवैध धंदे, Illegal Business, Crime Control, Police Investigation
- Illegal Liquor, Spurious Liquor, Toxic Alcohol, Police Action,
- फुगेवाडी, दापोडी, पिंपरी-चिंचवड, पुणे, विषारी दारू, हातभट्टी दारू, संशयास्पद मृत्यू,
- पोलिसांना सूचना, फुगेवाडी घटना
- खासदार श्रीरंग बारणे, Shrirang Barne, MP Shrirang Barne,