अवैध धंद्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या दोषी पोलिस व राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना निलंबित करा - आमदार शंकर जगताप
May 29 2026
24
अवैध धंद्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या दोषी पोलिस व राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना निलंबित करा - आमदार शंकर जगताप
फुगेवाडीत विषारी दारुमुळे झालेल्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी आमदार शंकर जगताप यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी
पिंपरी, ता. 29 - फुगेवाडी परिसरात गुरुवारी आणि शुक्रवारी विषारी दारूमुळे सुमारे दहा जणांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली. या प्रकरणी चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगताप यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवरून संपर्क साधला. या संपूर्ण अवैध धंद्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या दोषी पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना तडकाफडकी निलंबित करून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी जगताप यांनी केली आहे. पोलिसांची बैठक घेत या प्रकरणी तातडीने कडक पावले उचलावीत अशा सूचना देखील त्यांनी केल्या आहेत.
आमदार शंकर जगताप यांनी शुक्रवारी (ता. 29) तातडीने फुगेवाडी परिसराची प्रत्यक्ष पाहणी करून करून मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेतली.
या सर्व पीडित कुटुंबीयांना सर्व प्रकारच्या आरोग्य सुविधा पुरवण्यासोबतच शासकीय मदत मिळवून देण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली. या भागात कोणत्याही रुग्णाला अचानक त्रास झाल्यास त्यांना तात्काळ जिल्हा रुग्णालय किंवा ‘वायसीएम’ रुग्णालयात दाखल करून उपचार देण्याच्या सूचना त्यांनी आरोग्य विभागाला दिल्या.
आमदार जगताप यांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची बैठक घेतली. बैठकीला पोलीस उपायुक्त रोहिदास पवार, पोलीस उपायुक्त संदीप आटोळे, सहायक पोलिस आयुक्त विशाल हिरे , सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन हिरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय वाघमारे, पोलीस निरीक्षक भीमराव कोळी बैठकीला उपस्थित होते.
या गुन्ह्याच्या तपासात कोणतीही चालढकल सहन केली जाणार नाही, अशा सूचना जगताप यांनी पोलिसांना दिल्या.
परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी फुगेवाडी परिसरात रात्री ११ नंतर सर्व दुकाने व टपऱ्या सक्तीने बंद ठेवण्यात याव्यात, असे आदेश त्यांनी पोलिसांना दिले. तसेच रात्रीच्या वेळी तरुण मुले विनाकारण बाहेर फिरताना दिसल्यास पोलिसांनी तत्काळ त्यांच्या पालकांना बोलावून याविषयीची माहिती द्यावी व योग्य ती समज द्यावी, अशा सूचना त्यांनी या बैठकीत दिल्या.