चिंचवडमध्ये पवना नदीपात्रात भराव टाकल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
पिंपरी, ता. ११ - चिंचवड येथील चिंचवडे लॉन्स समोर सिटी सर्वे नं. २००७ या मोकळ्या जागेत अनधिकृत मातीचा भराव टाकल्याने पवना नदी व नदी शेजारी असलेल्या नैसर्गिक नाल्याची याची रुंदी कमी झाली आहे. त्यामुळे भराव टाकणाऱ्या दोघांविरोधात शुक्रवारी (ता. १०) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या पर्यावरण अभियांत्रिकी विभागातील उप अभियंता पंकज सुधाकर धेंडे यांनी फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भराव टाकण्याचा प्रकार १ मार्च २०२६ ते १० एप्रिल २०२६ या कालावधीत चिंचवडे लॉन्ससमोरील सिटी सर्व्हे क्रमांक २००७ येथील मोकळ्या जागेत चिचवडे लॉन्सजवळ राहणारे खंडु दामु चिचवडे व धनंजय खंडु चिचवड यांनी भराव टाकला. त्यामुळे पवना नदी तसेच नदीलगतच्या नैसर्गिक नाल्याची रुंदी कमी झाली, अशी माहिती पोलिसांनी दिली.
या प्रकरणात प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम १९७४, पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ तसेच भारतीय न्याय संहिता कलम २७० आणि ३२६(सी) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास सुरु आहे.