जुनी सांगवीत मालकीच्या वादातून वडील-मुलावर हातोड्याने हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा
पिंपरी, ता. १२ - जुनी सांगवी परिसरात मालमत्तेच्या वादातून वडील व मुलावर हातोड्याने हल्ला करुन त्यांना गंभीर जखमी केल्याची घटना बुधवारी (ता. ११) दुपारी घडली आहे. या प्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हरीष श्याम ढोरे (वय ४३, रा. पंचदीप अपार्टमेंट, जुनी पोस्ट ऑफिस लाईन, जुनी सांगवी, पुणे) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपी नारायण आत्माराम ढोरे, अभिजीत नारायण ढोरे व एका महिला आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०९, ११५ (२), ३५२, ३५१ (३) व ३ (५) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
घटना ११ मार्च रोजी दुपारी सुमारे १२.३० ते १.०० वाजण्याच्या दरम्यान, सर्व्हे नं. ९/ब/३ येथील कामधेनू बिल्डिंग, ढोरे नगर, गल्ली नं. २, जुनी सांगवी येथे घडली. फिर्यादी हरीष ढोरे व त्यांचे वडील श्याम ढोरे हे त्यांच्या तळमजल्यावरील फ्लॅटची साफसफाई करण्यासाठी गेले असता आरोपींनी मालकीच्या कारणावरुन त्यांच्याशी वाद घातला.
वाद वाढल्यानंतर आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या वडिलांना शिवीगाळ व दमदाटी करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच आरोपी नारायण ढोरे व अभिजीत ढोरे यांनी फिर्यादींच्या वडिलांच्या डोक्यात हातोड्याने वार करून त्यांना गंभीर जखमी केले. फिर्यादींनाही हातोडा व लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात सायंकाळी साडेपाच वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.