पाणी पुरवठ्याचा आर्थिक भार सोसायट्यांवर टाकल्यास बांधकाम विकसकांवर कायदेशीर कारवाई
पाणीपुरवठा समितीच्या बैठकीत महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचा इशारा
पिंपरी, ता. ३० - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत ज्या बांधकाम विकसकांनी फ्लॅटधारकांना ताबा देण्यापूर्वी पाणीपुरवठ्याची जबाबदारी स्वीकारत लेखी हमीपत्र दिले आहे, त्यांनी ती जबाबदारी काटेकोरपणे पार पाडणे बंधनकारक आहे. या जबाबदारीकडे दुर्लक्ष केल्यास तसेच पाणी पुरवठ्याचा आर्थिक भार सोसायट्यांवर टाकल्यास त्या विकसकांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाई, असा इशारा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिला.
महापालिकेने पाणीपुरवठ्याबाबत स्थापन केलेल्या समितीची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीमध्ये डॉ. सूर्यवंशी बोलत होते. पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे, सह शहर अभियंता अजय सूर्यवंशी, कार्यकारी अभियंता महेश बरिदे बैठकीला उपस्थित होते. बैठकीत पिंपरी चिंचवड व पुणे महापालिका क्षेत्रातील विविध गृहनिर्माण सोसायट्यांना भेडसावणाऱ्या पाणीटंचाईच्या तक्रारींचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
भामा आसखेड, आंद्रा पाणीपुरवठा योजनेसह काही महत्त्वाच्या जलपुरवठा प्रकल्पांची कामे अद्याप अपूर्ण असल्यामुळे सर्व क्षेत्रांना १०० टक्के पाणीपुरवठा करणे सध्या शक्य नाही, असे बैठकीत सांगण्यात आले.
नागरीकांनी तक्रार नोंदवावी .....
रहिवासी इमारतींमध्ये पाणी पुरवठ्याची जबाबदारी बांधकाम विकसकांवरच राहणार आहे. नागरिकांना पाणीपुरवठ्याबाबत अडचणी आल्यास महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे तक्रार नोंदवावी. नियमांनुसार कारवाई केली जाईल. - आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी