उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील पाणी पुरवठ्याचे नियोजन करावे, महापौरांचे आयुक्तांना निर्देश
उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील पाणी पुरवठ्याचे नियोजन करावे, महापौरांचे आयुक्तांना निर्देश
पिंपरी, ता. ३० - उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडमध्ये पाणीटंचाईची स्थिती निर्माण होऊ नये, यासाठी महापौर रवी लांडगे यांनी महापालिका आयुक्तांना तातडीने प्रभावी उपाययोजना राबविण्याचे निर्देश दिले आहेत. नागरिकांना नियमित, समतोल व पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा करणे ही महापालिकेची जबाबदारी असून त्यानुसार सर्व संबंधित विभागांनी समन्वय साधून कार्यवाही करावी, असे महापौरांनी सांगितले. याबाबतीत, दिरंगाई किंवा निष्काळजीपणा सहन केला जाणार नाही, असेही महापौरांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट केले आहे.
समर अॅक्शन प्लॅन -
शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पवना धरणातील उपलब्ध जलसाठा, भूजल पातळीतील घट व वाढती पाण्याची मागणी लक्षात घेता महापौरांनी तातडीने पावले उचलली आहेत. महापौरांनी प्रशासनाला उन्हाळा पूर्व कृती आराखडा (Summer Action Plan) तयार करुन प्रत्येक विभागाला स्पष्ट जबाबदाऱ्या सोपविण्याच्या सूचना केल्या. उपलब्ध धरण साठा, जलशुद्धीकरण केंद्रे व वितरण यंत्रणेचे सखोल परीक्षण करुन पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन करण्याच्या सूचना दिल्या.
जलवाहिन्यांची दुरुस्ती -
शहरातील मुख्य व उपजलवाहिन्यांमधील गळती तातडीने शोधून दुरुस्ती करण्यासह अनधिकृत नळजोडण्या व पाणीचोरीवर कडक कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले. संभाव्य टंचाईग्रस्त भागांची पूर्वनियोजित यादी तयार करुन आवश्यकतेनुसार टँकर पुरवठा व्यवस्था सज्ज ठेवण्याचेही सांगण्यात आले.
तक्रार निवारण यंत्रणा -
सार्वजनिक बोअरवेल, विहिरी व पूरक जलस्रोत कार्यान्वित ठेवण्याबरोबरच पाणीपुरवठ्याशी संबंधित तक्रारींवर तातडीने प्रतिसाद देण्यासाठी सक्षम तक्रार निवारण यंत्रणा कार्यान्वित करण्याचे निर्देश महापौरांनी दिले.
जनजागृती -
पाणी बचत, पुनर्वापर व अपव्यय नियंत्रणाबाबत जनजागृती केली जावी, याबाबत नियोजन करण्याच्या सूचना महापौरांनी दिल्या.
निष्काळजीपणा सहन केला जाणार नाही.....
''उन्हाळ्यात नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागू नये, यासाठी प्रशासनाने नियोजनबद्ध आणि परिणामकारक उपाययोजना तातडीने राबविणे आवश्यक आहे. पाणी ही मूलभूत गरज असून त्यामध्ये कोणतीही दिरंगाई किंवा निष्काळजीपणा सहन केला जाणार नाही. सर्व विभागांनी समन्वय साधून काम करत नागरिकांना नियमित आणि पुरेसा पाणीपुरवठा मिळेल याची खात्री करावी.'' - महापौर रवी लांडगे