पुणे महापालिकेत उपमहापौरांच्या कार्यालयात हाणामारी
पुणे, ता. २८ - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या कार्यक्रमासाठी ताडीवाला रस्ता येथे टाकलेला मंडप काढल्याची तक्रार घेऊन आरपीआयचे कार्यकर्ते नुकतेच उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्याकडे आले होते. त्यावेळी उपमहापौर कार्यालयात उपस्थित आरपीआयच्या दुसऱ्या गटाने ''तुम्ही वाढीव करायला आला का?'' असे म्हटल्याने आरपीआयच्या कार्यकर्त्यामध्ये कार्यालयातच हाणामारी झाली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या १४ एप्रिल रोजी होणाऱ्या कार्यक्रमासाठी पुणे स्टेशन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ महापालिकेचा एकच मंडप लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विविध संघटना कार्यकर्त्यांनी बॅनर, लहान स्वागत मंडप लावले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळील एक लहान मंडप काढल्याने ताडीवाला रस्ता परिसरातील कार्यकर्ते नाराज झाले. याबाबत नाराज कार्यकर्ते उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्याकडे तक्रार घेऊन आले होते. तेव्हा हा वाद झाला.
66
पुणे स्टेशन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ एक मंडप महापालिकेने काढल्याने काही कार्यकर्ते ही तक्रार घेऊन माझ्याकडे आले होते. ताडीवाला रस्ता भागातील कार्यकर्ते होते. माझ्या दालनात बसलेल्या एकाने त्यांना काहीतरी बोलले त्यावरून त्यांच्यात भांडणे झाली. यापूर्वीचे काहीतरी वादाला कारण असू शकते.
परशुराम वाडेकर, उपमहापौर, पुणे महापालिका