महापालिकेने दिव्यांग बांधवांना इलेक्ट्रिक वाहनांचे तत्काळ वाटप करावे, अन्यथा आंदोलन  - सचिन चिखले

पिंपरी, ता. २५  - महापालिकेने दिव्यांग बांधवांसाठी खरेदी केलेल्या तीन चाकी इलेक्ट्रिक वाहनांचे वाटप रखडले असल्याने दिव्यांग बंधू-भगिनींमध्ये कमालीची नाराजी आहे. महापालिकेने लवकरात लवकर या ई-वाहनांचे दिव्यांग बांधवांना वाटप करावे, अन्यथा आंदोलन केले जाईल, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी दिला आहे.

याबाबत चिखले यांनी महापौर रवी लांडगे आणि आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, दिव्यांग बंधू-भगिनींसाठी महापालिकेने खरेदी केलेली तीन चाकी इलेक्ट्रीक वाहने गेल्या दोन महिन्यांपासून दिव्यांग भवनाच्या पार्किंगमध्ये धूळ खात पडून आहेत. ही गोष्ट संतापजनक आहे आणि प्रशासनाच्या निष्क्रियतेचे व असंवेदनशीलतेचे उदाहरण आहे.

दिव्यांग नागरिकांना रोजगार, व्यवसाय, शिक्षण व दैनंदिन प्रवास सुलभ व्हावा, या उद्देशाने ही वाहने खरेदी केली होती. पर्पल जल्लोष कार्यक्रमात वाहन वाटपाची मोठ्या थाटात घोषणा केली. मात्र, आरटीओच्या तथाकथित तांत्रिक कारणांचा बागुलबुवा करून वाटप अचानक थांबविण्यात आले. अद्याप, एकाही लाभार्थ्याला वाहन मिळालेले नाही.  अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे दिव्यांग बंधू-भगिनींच्या हक्कांवर गदा येत आहे. महापालिकेने लवकरात लवकर ई-वाहनांचे दिव्यांग बांधवांना वाटप करावे, अन्यथा आंदोलन केले जाईल.

निवेदन देताना, पक्षाचे शहर सचिव रुपेश पटेकर, उपाध्यक्ष बाळा दानवले, विधानसभा अध्यक्ष मयूर चिंचवडे, प्रबुद्ध कांबळे, प्रवीण कांबळे उपस्थित होते.

''पात्र दिव्यांगांना ई-वाहने पिंपरी-चिंचवड शहरात व्यवसायासाठी देण्यात येत आहेत. त्यामुळे त्या वाहनांसाठी आरटीओचा परवाना घेणे आवश्यक आहे. परवाना काढल्यानंतर तात्काळ दिव्यांगांना वाहनांचे वाटप केले जाईल.'' - ममता शिंदे, उपायुक्त, समाज विकास विभाग


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories

Please Accept Cookies for Better Performance