आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी पिंपरी-चिंचवडबाबत केलेल्या चुकीच्या विधानाने शहरवासियांमध्ये नाराजी
आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी पिंपरी-चिंचवडबाबत केलेल्या चुकीच्या विधानाने शहरवासियांनध्ये नाराजी
पिंपरी, ता. ३१ - महापालिकेच्या संत तुकाराम महाराज संतपीठाच्या वतीने गांधर्व मंच संगीत स्पर्धेची माहिती देण्यासाठी सोमवारी (ता. ३०) पत्रकार परिषदेत आयोजित केली होती. स्पर्धेविषयी बोलताना महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी अगदी सहजपणे चुकीचे विधान केले. ते म्हणाले की, ''अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाला जगभर ओळख आहे, मात्र 'पीसीएमसी'ला जगात कोणी ओळखत नाही.''
डॉ. सूर्यवंशी यांच्या या विधानावर उपस्थित पत्रकारांनी तीव्र नाराजी व आक्षेप नोंदवला. आयुक्तांचे हे विधान बातम्यांमध्ये आणि सोशल मिडीयावरही प्रसिद्ध झाल्याने शहरवासियांनीही त्यावर नाराजी व्यक्त केली आहे. काल सायंकाळपासून शहरात आयुक्त डॉ. सूर्यंवशींच्या याच वक्तव्याची चर्चा आहे.
डॉ. सूर्यवंशी यांनी नव्यानेच पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आयुक्तपदाचा पदभार स्विकारला आहे. पिंपरी-चिंचवड शहराचा त्यांचा अजून सखोल अभ्यास व्हायचा आहे. तोवर त्यांनी बोलता-बोलता सहजतेने केलेल्या या विधानाने शहरवासियांच्या मनात नाराजी व चीड आहे.