पिंपरी-चिंचवडबाबतच्या आक्षेपार्ह वक्तव्याबाबत आयुक्तांनी शहरवासियांची माफी मागावी
Mar 31 2026
42
पिंपरी-चिंचवडबाबतच्या आक्षेपार्ह वक्तव्याबाबत आयुक्तांनी शहरवासियांची माफी मागावी
सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांची मागणी, मुख्यमंत्री व महापौरांना निवेदन
पिंपरी, ता. ३१ - महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सोमवारी (ता. ३१) अगदी सहजपणे ''अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाला जगभर ओळख आहे, मात्र 'पीसीएमसी'ला जगात कोणी ओळखत नाही.'' असे आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. या वक्तव्याचा सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी निषेध केला आहे व डॉ. सूर्यवंशी यांची शहरवासियांची माफी मागावी अशी मागणी काळभोर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महापौर रवी लांडगे व पुणे विभागीय आयुक्तांकडे केली आहे. आयुक्तांनी तात्काळ माफी मागितली नाह तीव्र जनआंदोलन करण्याचा इशाराही काळभोर यांनी दिला आहे.
याबाबत, काळभोर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आयुक्त पदावर बसलेल्या व्यक्तीने अशा प्रकारे शहराचा अपमान करणे हे दुर्दैवी आणि निषेधार्ह आहे. पिंपरी-चिंचवड हे शहर आशिया खंडातील एक प्रमुख औद्योगिक केंद्र म्हणून ओळखले जाते. 'शासकीय आणि श्रीमंत महानगरपालिका' म्हणून या शहराचा लौकिक आंतरराष्ट्रीय स्तरावर असताना, आयुक्तांनी शहराची ओळख नाकारणे हा इथल्या कष्टकरी जनता आणि उद्योजकांचा अपमान आहे.
विभागीय आयुक्त पदावरुन महापालिका आयुक्त म्हणून नियुक्ती झाल्यानंतर, शहराचा गौरव वाढवण्याऐवजी आयुक्तांनी शहराची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांचे हे विधान त्यांचे प्रशासकीय अपयश आणि शहराप्रती असलेली नकारात्मक वृत्ती दर्शवते. संत ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या विचारांचा वारसा लाभलेल्या या नगरीला 'कोणी ओळखत नाही' असे म्हणणे, हे या मातीच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाचा अवमान करणारे आहे.
आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आपल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल पिंपरी-चिंचवडच्या जनतेची बिनशर्त जाहीर माफी मागावी. भविष्यात अशा प्रकारे शहराची प्रतिमा मलीन होणार नाही, याची प्रशासकीय स्तरावर दखल घेतली जावी. एका वरिष्ठ पदावरील अधिकाऱ्याकडून झालेल्या या बेजबाबदार वर्तवणुकीची शासन स्तरावर नोंद घेतली जावी, असे काळभोर यांनी निवेदनात म्हटले आहे.