कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ पुरोगामी संघटनांचे आंदोलन
पिंपरी, ता. २५ - भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून पुण्यातील काँग्रेसभवनमध्ये कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ तसेच भाजपच्या विरोधात सातत्याने आणि सत्याने बाजू मांडणारे हनुमंत पवार यांच्यावर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ बुधवारी (ता. २४) पिंपरी चौकात आंदोलन करण्यात आले. काँग्रेस पक्ष आणि शहरातील विविध पुरोगामी संघटना आंदोलनात सहभागी झाल्या.
आंदोलनात भाजप विरोधी जोरदार घोषणा देण्यात आल्या, हातामध्ये विविध आशयाचे मथळे फलक घेऊन कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले. 'हम सब हनुमंत पवार', 'विचारांची लढाई विचारांनी लढा', 'विचाराला हिंसेने थांबवता येत नाही', 'जेवढे हल्ले तेवढा आवाज बुलंद' अशा आशयाचे फलक कार्यकर्त्यांच्या हातामध्ये होते.
अपना वतन संघटनेचे सिद्दिक शेख, जितेंद्र छाबडा, संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रवीण कदम, ॲड. अशोक धायगुडे, संदेश पीटर जगताप, समरीन कुरेशी, शिक्षण मंडळाचे माजी सभापती अभिमन्यु दहितुले, मारुती भापकर, काँग्रेसचे प्रदेश सचिव अशोक मोरे, काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष नरेंद्र बनसोडे, अल्पसंख्याक विभागाचे शहर अध्यक्ष शहाबुद्दीन शेख, महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे शहर अध्यक्ष संजय बारी, मनीषा पवार, NSUI च्या प्रदेश सचिव शितल उबाळे, हिराचंद जाधव, नीरज कडू, प्रदीप पवार, जितेंद्र छाबडा, उमेश बनसोडे, वीरेंद्र गायकवाड, शय्यान अन्सारी, गिरीश वाघमारे आंदोलनात सहभागी झाले.
काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष नरेंद्र बनसोडे म्हणाले, ''या भ्याड हल्ल्यांमुळे भाजपची घबराट उघड झाली आहे, काँग्रेस नेत्यांच्या वक्तव्यावर आणि काँग्रेस प्रवक्तांवर होत असलेल्या हल्ल्याने हे स्पष्ट दिसून येते आहे की भाजप ही आपली सत्ता जाईल परिवर्तन होईल या भीतीने घाबरून गेली आहे, म्हणून अशा परिवर्तनाची ताकत असलेल्या आणि सत्य समोर आणून भाजपचा खरा चेहरा उघड करणाऱ्या गोष्टींना ते तीव्र स्वरूपाचा विरोध करत आहेत.अशा हल्ल्याने खचून न जाता उलट अजून जोमाने पवार आणि काँग्रेसचे कार्यकर्ते कामाला लागतील. ''
मारुती भापकर म्हणाले, ''या शहरातील सामाजिक चळवळ अतिशय सक्रिय आहे या ठिकाणी महापुरुषांच्याबाबत चुकीचे वक्तव्य केल्या बाबत मंत्री चंद्रकांत पाटील यांना शाही फेक आंदोलनांद्वारे निषेध केला होता, या प्राप्त परिस्थितीत लातो के भूत बातो से नहीं मानते ही भूमिका देखील घेतली गेली पाहिजे, भाजप विरोधी राहुल गांधी सक्षम पणे लढत आहेत सर्वांनी त्यांना साथ देण्यासाठी एकत्र यावे अशी गरज सध्या देशात निर्माण झाली आहे. यापुढील काळात जसास तसे उत्तर देण्याची तयारी ठेवा, या प्रकरणी भाजपाचा जाहीर निषेध करतो''
ज्येष्ठ समाजसेवक मानव कांबळे म्हणाले, ''काँग्रेस भवन आणि हनुमंत पवार हल्ला या घडलेल्या घटना अतिशय अन्यायकारक आणि चीड निर्माण करणाऱ्या आहेत. आम्ही शिवराय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुलेंना मानतो आम्ही राजश्री शाहूंना मानतो म्हणून आमची वैचारिक लढाई आहे मात्र त्यात पराभव होत असल्याने विरोधक दहशतीचा मार्ग अवलंबत आहेत. ''