पिंपरीत तक्रारीच्या कारणावरुन व्यापाऱ्याला मारहाण, एकाला अटक
पिंपरी, ता. ५ - तक्रार दिल्याच्या रागातून एका व्यापाऱ्याला मारहाण केल्याची घटना सोमवारी (ता. ३) रात्री शास्त्रीनगर-पिंपरीमध्ये घडली. या प्रकरणी पिंपरी पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.
याबाबत राजबहादूर रामदास यादव (वय ४५ वर्षे, व्यापारी, रा. शास्त्रीनगर, डिलक्स टॉकीज मागे, पिंपरी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार स्वप्निल चंदनशिवे (वय अंदाजे २१), ललितेश पिंगळे आणि अनिश पिंगळे (रा. शास्त्रीनगर, पिंपरी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यादव हे सोमवारी रात्री सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घरी जेवण करत होते. त्यावेळी दरवाजा ठोठावल्याने ते बाहेर आले. त्यानंतर आरोपी स्वप्निल चंदनशिवे याने “आमच्याविरुद्ध तक्रार का दिली?” असे विचारत यादव यांना हाताने मारहाण केली. तसेच आरोपी ललितेश पिंगळे व अनिश पिंगळे यांनी लोखंडी रॉडने त्यांच्या कपाळावर व नाकावर मारहाण केली. यावेळी शिवीगाळ करत ठार मारण्याची धमकीही दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
या घटनेप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ११८ (१), ११५ (२), ३५१ (२) (३), ३५२ ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी स्वप्निल चंदनशिवे याला पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.