पंतप्रधान आवास योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पीएमआरडीए 'शहरस्तरीय तांत्रिक कक्ष' स्थापन करणार
Apr 04 2026
52
पंतप्रधान आवास योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पीएमआरडीए 'शहरस्तरीय तांत्रिक कक्ष' स्थापन करणार
पिंपरी, ता. ४ - पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीतील ६७४ गावांमधील 'पंतप्रधान आवास योजने'ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी 'शहरस्तरीय तांत्रिक कक्ष' स्थापन केला जाणार आहे आणि या कक्षासाठी आवश्यक असलेल्या तज्ज्ञांची पदे तातडीने भरली जाणार आहेत. त्याबाबच्या सूचना 'पीएमआरडीए'चे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.
'पीएमआरडीए'च्या अभियांत्रिकी विभागाच्या आढावा बैठकीत डॉ. अभिजित चौधरी यांनी या सूचना दिल्या. बैठकीमध्ये 'लाभार्थी आधारित बांधकाम' आणि 'भागीदारीतून परवडणारी घरे' या दोन प्रमुख घटकांसाठी अनुभवी व तज्ज्ञ संस्थांची नियुक्ती करण्याचा निर्णय झाला.
पीएमआरडीए हद्दीतील नऊ तालुक्यांमध्ये मोक्याच्या शासकीय जागांचा शोध घेण्यासाठी विशेष मोहिम राबवली जाणार आहे. या जागांवर 'Affordable Housing in Partnership - AHP' घटकांतर्गत गृहप्रकल्प उभारण्याच्या शक्यतेची पडताळणी केली जाईल. शक्यतो प्रत्येक विधानसभा मतदारसंघात किमान एक तरी प्रकल्प उभारण्याचे नियोजन केले जात आहे. 'पंतप्रधान आवास योजना-२' अंतर्गत गावठाण भागातील प्रस्तावांनाही मंजुरी देण्याबाबत प्राधिकरणाकडून विचार सुरु आहे, असे डॉ. चौधरी यांनी सांगितले.