उन्हाळी सुट्ट्यांसाठी पुण्यातून धावणाऱ्या रेल्वेगाड्यांचे बुकींग फुल्ल, प्रवासी प्रतिक्षेत
उन्हाळी सुट्ट्यांसाठी पुण्यातून धावणाऱ्या रेल्वेगाड्यांचे बुकींग फुल्ल, प्रवासी प्रतिक्षेत
पुणे, ता. २० - शाळांच्या वार्षिक परीक्षा संपून आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरु होणार आहेत. कामानिमित्त शहरात स्थायिक झालेली अनेक कुटुंब गावाला जाण्याची तयारी करत आहेत तोवरच पुण्यातून धावणाऱ्या झेलम, आझाद हिंद लखनौ, दानापूर आणि अजमेर एक्स्प्रेससह इतर महत्त्वाच्या रेल्वे गाड्यांचे १६ मेपर्यंतचे बुकींग पूर्ण झाले आहे. झेलम, आझाद हिंद आणि दानापूर या गाड्यांचे तिकीट बुकिंग थांबवले आहे आणि परिणामी अनेक प्रवाशांना प्रतिक्षा करावी लागणार आहे.
प्रवासी पल्ल्याच्या प्रवासासाठी रेल्वेला प्राधान्य देतात. पूर्वी चार महिने अगोदर रेल्वे तिकीट बुक करता येत होते. आता त्याचा कालावधी दोन महिने केला आहे. त्यामुळे १६ मेपर्यंत पुण्यातून धावणाऱ्या बऱ्याच रेल्वेगाड्या फुल झाल्या आहेत. सध्या दानापूर एक्स्प्रेससाठी - ११९ प्रवासी प्रतिक्षेत आहेत. झेलम एक्स्प्रेससाठी - २५ प्रवासी व हावडा एक्सप्रेससाठी ८२ प्रवासी प्रतिक्षेत आहेत. गोवा एक्स्प्रेस व गोरखपूर एक्स्प्रेसचे बुकींग थांबवले आहेत, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
उन्हाळी सुटी, दिवाळी आणि छटपूजा व इतर गर्दीच्या वेळी पुणे विभागातून सर्व प्रमुख शहरांसाठी जादा रेल्वेगाड्या सोडल्या जातात. गेल्या वर्षी पुणे विभागातून उन्हाळी सुटीत ८०० पेक्षा जास्त रेल्वेगाड्या विविध मार्गावर सोडण्यात आल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांची चांगली सोय झाली होती व रेल्वेलाही फायदा झाला. यंदाही उन्हाळी सुटीत जादा रेल्वेगाड्या सोडण्याचे नियोजन रेल्वे प्रशासन करीत आहे. एप्रिल आणि मेमध्ये आणखी गाड्यांची संख्या वाढविण्यात येणार आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.