स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही सर्वसामान्य माणसांचा हक्कांसाठी संघर्ष सुरु - विचारवंत किरणजितसिंह
Mar 20 2026
36
स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही सर्वसामान्य माणसांचा हक्कांसाठी संघर्ष सुरु - विचारवंत किरणजितसिंह
पुणे, ता. २० - ''स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही सर्वसामान्य माणूस, शेतकरी यांना स्वातंत्र्य, न्याय्य हक्कांसाठी संघर्ष करावा लागतोय.'', अशी खंत भगतसिंह यांचे पुतणे व विचारवंत किरणजितसिंह यांनी व्यक्त केली.
गुरुवारी (दि. १९) पुण्यात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
सरहद पुणे आणि कृष्णा पब्लिकेशन यांच्या वतीने शहीद भगतसिंह यांच्या पुतणीने लिहिलेल्या 'युगद्रष्टा भगतसिंह आणि त्यांचे मृत्युंजयी पूर्वज' या भगतसिंह यांच्या अधिकृत जीवनचरित्राचे प्रकाशन पुण्यात शुक्रवारी (ता. २०) होत आहे. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढणारे राजू शेट्टी यांना 'युगद्रष्टा भगतसिंह राष्ट्रीय पुरस्कार' प्रदान केला जाणार आहे. त्यानिमित्ताने विचारवंत किरणजितसिंह पुण्यात आले आहेत.
किरणजितसिंह माध्यमांशी संवाद साधला. बोलताना त्यांनी भगतसिंह व त्यांच्या कुटुंबीयांच्या आठवणींना उजाळा दिला. किरणजितसिंह म्हणाले, ''भगतसिंह हे देशासाठी हुतात्मा झालेले क्रांतिकारक आहेत आणि भगतसिंह हा एक विचार व वृत्ती आहे. स्वातंत्र्यासाठी, शेतकऱ्यांसाठी आणि शोषितांसाठी लढणारा विचार म्हणजे भगतसिंह आहे. त्यामुळे हुतात्मा भगतसिंह यांचे विचार नेहमीच आपल्याला प्रेरणा देत राहतील.''
यावेळी सरहद संस्थेचे संजय नहार, कृष्णा पब्लिकेशनचे संचालक चेतन कोळी, जीवनचरित्राच्या अनुवादक इंद्रायणी चव्हाण उपस्थित होते.