'आरटीओ' कार्यालयाने अटकाव केलेली वाहने सोडवून घ्यावीत, अन्यथा लिलाव होईल
Mar 06 2026
53
'आरटीओ' कार्यालयाने अटकाव केलेली वाहने सोडवून घ्यावीत, अन्यथा लिलाव होईल
पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाची सूचना
पिंपरी, ता. ६ - पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) अटकाव केलेल्या १०३ वाहन मालकांना ३० दिवसांची अंतिम सूचना दिली आहे. या वाहनांमध्ये प्रवासी वाहने, मालवाहू टेम्पो, शालेय बस, ट्रक आणि दुचाकींचा समावेश आहे. थकीत वाहन कर, तडजोड शुल्क भरून वाहने सोडवून घ्या, अन्यथा जाहीर लिलावात विकली जातील, असा इशारा दिला आहे.
वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन, बेकायदेशीर पार्किंग, वैध कागदपत्रांचा अभाव, अपघात किंवा गुन्ह्यात सहभाग असल्यामुळे पोलीस किंवा आरटीओ अधिकाऱ्यांनी कायदेशीर कारवाई करुन ताब्यात घेतलेली ही वाहने आरटीओ पिंपरी चिंचवड, खेड-राजगुरुनगर एसटी डेपो आणि मंचर एसटी डेपो येथे महिन्यांपासून पडली आहेत. आता ही वाहने खराब होत आहेत. तसेच, त्यांना आग लागण्याचा धोका आहे.
या पार्श्वभूमीवर वाहनांचे मालक, चालक किंवा वित्तदाते यांनी कागदपत्रे दाखवून दंड भरावा, अन्यथा बेवारस वाहन म्हणून लिलाव प्रक्रिया राबवली जाईल. लिलाव प्रक्रिया eauction.gov.in किंवा www.mstcindia.co.in या संकेतस्थळांवर होईल. वाहनांची वयोमानानुसार यादी आरटीओ नोटीस बोर्डावर चिकटवली आहे. वाहन मालकांनी-चालकांनी आरटीओ कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.