news
clock

काळेवाडी फाटा येथे भरधाव टेम्पोची वाहनांना धडक, अल्पवयीन टेम्पोचालक ताब्यात

पिंपरी, ता. ९ - रहाटणी परिसरातील काळेवाडी फाटा सिग्नलवर रविवारी (दि. ८ मार्च) सकाळी सुमारे ९.४५ वाजण्याच्या सुमारास भरधाव टेम्पोने अनेक वाहनांना धडक दिल्याची घटना घडली. या अपघातात तीन जण जखमी झाले असून संबंधित अल्पवयीन चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

या घटनेत जखमी झालेले मनीषकुमार शंभूनाथ ठाकूर (वय ३५ वर्षे, रहाटणी) यांनी काळेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जीवन तानाजी यादव (वय १७, रा. स्वामी समर्थ कॉलनी, तापकीर चौक, काळेवाडी) हा अल्पवयीन असून त्याच्याकडे कोणताही वाहन परवाना नसताना तो  टेम्पो चालवत होता. सिग्नलजवळ भरधाव वेगात आणि वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून टेम्पो चालवित असताना त्याने अनेक वाहनांना धडक दिली.

या अपघातात फिर्यादी मनीषकुमार ठाकूर यांची हिरो स्प्लेंडर मोटारसायकल,  होंडा सिटी कार,  रिक्षा, स्विफ्ट कार,  ह्युंदाई आय१० कार आणि होंडा शाईन मोटारसायकल या वाहनांना धडक बसली. या अपघातात फिर्यादी ठाकूर, रिक्षा चालक आणि होंडा शाईन चालक जखमी झाले असून सर्व वाहनांचे नुकसान झाले आहे.

या प्रकरणी काळेवाडी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ११०, २८१, १२५ (अ) तसेच मोटार वाहन कायदा कलम ३(१)/१८१, १८४, १४६/१९६ आणि ११९/१७७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाहन चालविण्यास अल्पवयीन मुलास दिल्याप्रकरणी संबंधित महिला आरोपीला अटक करण्यात आली असून अल्पवयीन चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories