डंपरच्या धडकेत तरुणाचा मृत्यू, चालकाला अटक
पिंपरी, ता. २० - भरधाव वेगातील डंपरने दुचाकीला समोरुन धडक दिली. यात २६ वर्षीय दुचाकीस्वाराला प्राण गमावावे लागले आहेत. हा अपघात बुधवारी (ता. १८) पुणे बँगलोर हायवेवर-किवळे येथे घडला आहे. पोलिसांनी डंपर चालकाला अटक केली आहे. सनी कैलास सोनवणे असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १८ मार्च २०२६ रोजी सुमारे दुपारी ३.४० वाजण्याच्या सुमारास पवना ब्रिजकडून समीर लॉन्सकडे जाणाऱ्या सर्व्हिस रोडवर, कृष्णा वडेवाले हॉटेलसमोर (पुणे-बंगळुरू महामार्ग, किवळे, ता. हवेली, जि. पुणे) हा अपघात घडला.
या घटनेत मरण पावलेला सनी हा आपल्या अॅक्टिवावरुन जात असताना समोरुन येणाऱ्या अशोक लेलँड कंपनीच्या डंपरने त्याला जोरदार धडक दिली. या धडकेत गंभीर जखमी होऊन सनीचा मृत्यू झाला.
आरोपी डंपर चालक विष्णु एकनाथ लोखंडे (वय ३८, रा. रावेत) याने विनापरवाना वाहन चालवून वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करत बेदरकारपणे आणि भरधाव वेगाने डंपर चालवला आहे, असे पोलिसांनी सांगितले.
आरोपीविरोधात रावेत पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम १०६(१), १२५(अ), १२५(ए), २८१ तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ व ३(१)/१८१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे.