शहरातील रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्याला सर्वोच्च प्राधान्य देणार - अभिषेक बारणे 

पिंपरी, ता. ३ - ''पिंपरी-चिंचवड शहराचा विस्तार वेगाने होत असताना नागरिकांच्या अपेक्षाही वाढत आहेत. या अपेक्षांच्या पूर्ततेसाठी स्थायी समितीची जबाबदारी मोठी आहे आणि शहराचा विकास आराखडा डोळ्यासमोर ठेवून रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्याला आपले सर्वोच्च प्राधान्य असेल.'' अशी भूमिका पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीचे नवनिर्वाचित सभापती अभिषेक बारणे यांनी स्थायी समिती सभापतीपदाचा अधिकृत पदभार स्वीकारल्यानंतर मांडली.  

 महापालिका भवनातील स्थायी समिती सभापतींच्या दालनात हा पदभार स्वीकारण्याचा समारंभ झाला. यावेळी चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगताप यांनी नवनिर्वाचित सभापती बारणे यांचे पुष्पगुच्छ देऊन विशेष अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. त्यावेळी बारणे यांनी आपल्या पुढील कामकाजाबाबत माहिती दिली. 

बारणे म्हणाले, ''पिंपरी-चिंचवड हे देशातील एक प्रगत शहर म्हणून ओळखले जाते. या शहराचा नावलौकिक वाढवण्यासाठी पारदर्शक आणि गतीमान कारभारावर माझा भर राहील. प्रामुख्याने पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन, रस्ते विकास आणि आरोग्य सुविधा यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर स्थायी समितीच्या माध्यमातून ठोस निर्णय घेतले जातील. सामान्य नागरिकांच्या करातून जमा होणारा पैसा हा शहराच्या हितासाठी आणि दर्जेदार कामांसाठीच खर्च होईल, याची काटेकोरपणे खबरदारी घेतली जाईल.'' 

आमदार शंकर जगताप, आमदार महेश लांडगे, आमदार उमा खापरे, आमदार अमित गोरखे यांच्या मार्गदर्शनाखाली शहराच्या विविध भागांतील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासनाशी समन्वय साधून काम करणार, असे बारणे यांनी सांगितले.


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories

Please Accept Cookies for Better Performance