दहावीची परीक्षा उद्यापासून सुरु, शिस्तबद्ध परीक्षेसाठी महापालिका प्रशासनाकडून तयारी
पिंपरी, ता. १९ - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावीच्या लेखी परीक्षेला शुक्रवारपासून (ता. २०) पासून सुरुवात होत आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात एकूण ५१ परीक्षा केंद्रांवर २५ हजार ७७९ विद्यार्थी शालान्त परीक्षा देणार आहेत.
विद्यार्थ्यांना तणावमुक्त, सुरक्षित-शिस्तबद्ध वातावरणात व शांततेत परीक्षा देता यावी, यासाठी प्रशासनाने सर्व तयारी केली आहे. जिल्हाधिकारी तसेच महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या आदेशानुसार दोन भरारी पथकांची नियुक्ती केली आहे. याशिवाय, बैठी भरारी पथके परीक्षा केंद्रावर असतील. सर्व परीक्षा केंद्रांवर पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. प्रत्येक परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची निगराणी असणार आहे.
सर्व परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी सूचनांचे काटेकोर पालन करावे, वेळेपूर्वी परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे आणि कोणतेही प्रतिबंधित साहित्य सोबत आणू नये, अशा सूचना महाराष्ट्र बोर्ड व महापालिका प्रशासनाने दिल्या आहेत.
शिस्तबद्ध परीक्षेसाठी सर्वसमावेशक नियोजन
परीक्षेच्या कालावधीत संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक, सुरक्षित आणि शिस्तबद्ध राहावी यासाठी सर्वसमावेशक नियोजन केले आहे. भरारी पथके, सीसीटीव्ही निरीक्षण व पोलीस बंदोबस्ताद्वारे गैरप्रकारांना आळा घातला जाईल. - ममता शिंदे, उपायुक्त, महापालिका
सर्व परीक्षार्थींना शुभेच्छा
इयत्ता दहावीची परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. विद्यार्थ्यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून, आत्मविश्वासाने आणि शांत मनाने परीक्षा द्यावी. तुमच्या कष्टांचे निश्चितच यशात रूपांतर होईल, असा मला विश्वास आहे. सर्व विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा.
— रवी लांडगे, महापौर, पिंपरी-चिंचवड महापालिका
------------------------------------------------------------------------------------------------------