भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नावर सर्वसाधारण सभेत जोरदार चर्चा, प्रशासनाला प्रतिकात्मक कुत्रा भेट
पिंपरी, ता. २० -पिंपरी-चिंचवड महापालिकाच्या शुक्रवारी (ता. २०) झालेल्या सर्वसाधारण सभेत शहरातील भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नावर जोरदार चर्चा झाली. भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक राजू मिसाळ यांनी या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी प्रतिकात्मक कुत्रा आयुक्त आणि महापौरांसमोर भेट म्हणून ठेवला.
नगरेसवक मिसाळ म्हणाले, ''निवडणूक प्रचारादरम्यान नागरिकांकडून भटक्या कुत्र्यांमुळे होणाऱ्या त्रासाबाबत अनेक तक्रारी मिळाल्या आहेत. नुकतेच शाळेच्या बसमधून उतरत असताना मुलांवर कुत्र्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे. या भटक्या कुत्र्यांमुळे शहरात सर्वत्र नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे.''
यावेळी, गेल्या दहा वर्षांतील कुत्रा चावण्याच्या घटनांची आकडेवारी सादर करण्यात आली. सन २०१६-१७ मध्ये १० हजार ५३३ घटना घडल्या. सन २०१७-१८ मध्ये १३ हजार ५५८ जणांना कुत्र्याने चावा घेतला आहे. सन २०१८-१९ मध्ये १४ हजार ८४२ जणांना कुत्रा चावला आहे. सन २०१९-२० मध्ये १२ हजार ७५१ घटना घडल्या आहेत. सन २०२०-२१ मध्ये १३ हजार ८३२ घटना घडल्या आहेत. सन २०२१-२२ मध्ये १३ हजार ८९२ जणांना कुत्रा चावला आहे. सन २०२२-२३ मध्ये १८ हजार ५०० जणांना कुत्रा चावला आहे. सन २०२३-२४ मध्ये २४ हजार १६९ घटना घडल्या आहेत आणि सन २०२४-२५ मध्ये तब्बल २८ हजार ९९ कुत्रा चावण्याच्या घटना शहरात घडल्या आहेत.
आकडेवारीमुळे या प्रश्नाचे गांभिर्य अधोरेखित झाले आहे. कुत्री चावण्याच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिका प्रशासनाने ठोस धोरण आखावे, तात्काळ उपाययोजना कराव्यात, अशी मागणी सभागृहात करण्यात आली आहे.