सांगवीतील जिल्हा रुग्णालयात नवजात शिशु अतिदक्षता विभाग सुरु होणार, आयसीयू बेडच्या संख्येतही वाढ
पिंपरी, ता. २८ - विधानसभेत चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांनी शहरातील आरोग्य सेवांच्या सक्षमीकरणाबाबत लक्षवेधी उपस्थित केली. त्यावर, सांगवीतील पुणे जिल्हा रुग्णालयातील आयसीयू बेडची संख्या आता ६ वरून १४ करण्यात आली आहे. येथे लवकरच बालकांसाठी नवजात शिशु अतिदक्षता विभाग (एनआयसीयू) सुरु करण्यात येईल, असे आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी सांगितले.
अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान आमदार शंकर जगताप यांनी आरोग्य सेवांच्या दुरावस्थेकडे सभागृहाचे लक्ष वेधले. सांगवी येथील जिल्हा रुग्णालयातील सध्याची स्थिती समाधानकारक नसल्याचे सांगत, त्यांनी तेथील अतिदक्षता विभागाची क्षमता वाढविण्याची गरज व्यक्त केली. विशेषतः ग्रामीण भागातील रुग्णांना आणि लहान बालकांना वेळेवर उपचार मिळावेत, यासाठी ग्रामीण रुग्णालयांमध्ये ‘एनआयसीयू सुविधा तातडीने उपलब्ध करुन देण्याची आग्रही मागणी त्यांनी मांडली.
यावेळी या रुग्णालयातील CT SCAN व MRI सारख्या वैद्यकीय सुविधा देणाऱ्या युनिक वेलनेस या बाह्य कंत्राटदार संस्थेबद्दल बोलताना आमदार जगताप यांनी एका गंभीर मुद्द्याकडे लक्ष वेधले. रुग्णालयातील वैद्यकीय चाचण्यांचे कंत्राट मागील वर्षभरापासून ‘युनिक वेलनेस’ या संस्थेकडे आहे. नियमानुसार या सर्व चाचण्या रुग्णालयात होणे बंधनकारक असताना, रुग्णांना विनाकारण MRI करण्याकरिता बाहेर पाठवले जात असल्याची तक्रार त्यांनी केली. ही बाब रुग्णांसाठी आर्थिक आणि मानसिक त्रासाची असून, या गैरप्रकाराला जबाबदार असणाऱ्या संस्थेवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.
आमदार जगताप यांच्या प्रश्नांना उत्तर देताना आरोग्य राज्यमंत्री मा. मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. त्या म्हणाल्या सांगवीतील पुणे जिल्हा रुग्णालयातील आयसीयू बेडची संख्या आता ६ वरून १४ करण्यात आली आहे. लवकरच बालकांसाठी एनआयसीयू बेड सुरु करण्यात येतील. सांगवी येथे २०० बेड क्षमतेचे नवीन सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभारण्याचा प्रस्ताव असून, यामुळे जिल्हा रुग्णालयाची क्षमता प्रमाणात वाढणार आहे. रुग्णालयातील कंत्राटी ‘ संस्थेबाबत आलेल्या तक्रारींची सखोल चौकशी केली जाईल. तपासात दोषी आढळल्यास संस्थेवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे आश्वासन मंत्र्यांनी दिले.
आमदार शंकर जगताप म्हणाले, ''जिल्हा रुग्णालय, सांगवी हे संपूर्ण जिल्ह्यासाठी महत्त्वाचे आरोग्य केंद्र आहे. मात्र, येथील आयसीयू बेडची कमतरता आणि एनआयसीयू सुविधेचा अभाव यामुळे गरीब रुग्णांची मोठी गैरसोय होत होती. विशेषतः नवजात बालकांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात न्यावे लागणे हे क्लेशदायक आहे. तसेच, ‘कंत्राटी संस्था रुग्णालयात चाचण्या उपलब्ध असताना रुग्णांना बाहेर पाठवून त्यांची लूट करत असतील, तर ते आम्ही कदापि सहन करणार नाही. सामान्य माणसाच्या आरोग्याशी खेळणाऱ्या अशा संस्थांची सखोल चौकशी करून त्यांचे कंत्राट रद्द करावे आणि त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई व्हावी, हीच आमची आग्रही मागणी आहे. सरकारने आता बेडची संख्या वाढविण्याचे आणि सुपर स्पेशालिटी दर्जा देण्याचे जे आश्वासन दिले आहे, त्याची तातडीने अंमलबजावणी व्हावी यासाठी माझा सातत्याने पाठपुरावा सुरू राहील.''