रस्ता ओलांडताना भरधाव टेम्पोची धडक बसून तरुणाचा मृत्यू
पिंपरी, ता. २७ - चाकण-तळेगाव हायवेवरील मराठा क्रांती चौकाजवळ नवी भाजी मंडईसमोर भरधाव टेम्पोची धडक बसून एका पादचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. हा अपघात मंगळवारी (ता. २५) रात्री ८.३० च्या सुमारास घडला आहे. आरोपी विरोधात गुरुवारी (ता. २६) तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अब्दुल कादीर सरदार पटेल (वय ५८, रा. दुर्गा सेवासंघ प्लॉट नं. ८, झोपडपट्टी, लोटस कॉलनी, गोवंडी, मुंबई) असे आरोपीचे नाव असून तो टाटा कंपनीचा टेम्पो (क्र. MH 04 EB 3364) चालवत होता. त्याने वाहन हयगयीने व निष्काळजीपणे भरधाव वेगात चालवून रस्ता ओलांडत असलेल्या तरुणाला (वय अंदाजे ३० ते ३५ वर्षे) धडक दिली. या धडकेत गंभीर दुखापत होऊन तरुणाचा मृत्यू झाला.
आरोपी टेम्पो चालकाविरोधात भारतीय न्याय संहिता कलम १०६(१), २८१, १२५(अ), १२५(ब) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. पोलिस तपास करत आहेत.