पिंपरी-चिंचवड महापालिकेची करवसुलीमध्ये उल्लेखनीय कामगिरी

पिंपरी-चिंचवड महापालिकेची करवसुलीमध्ये उल्लेखनीय कामगिरी

पिंपरी-चिंचवड महापालिकेची करवसुलीमध्ये उल्लेखनीय कामगिरी

सन २०२५-२६ मध्ये कर संकलन विभागाची ९६१ कोटींची वसुली, महापौर रवी लांडगे व आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी मानले करदात्यांचे आभार

पिंपरी, ता. १ - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर संकलन व कर आकारणी विभागाने २०२५-२०२६ या आर्थिक वर्षात तब्बल ९६१ कोटींहून अधिक रुपयांचा कर वसूल केला आहे. महापालिकेने सलग दुसऱ्यांदा साडेनऊशे कोटींचा टप्पा पार करत कर वसुलीत उल्लेखनीय कामगिरी नोंदवली आहे. ७ लाख ३२ हजार मालमत्ताधारकांपैकी ६ लाख ३१ हजार ६१५ मालमत्ताधारकांनी कराचा भरणा केला आहे. कर भरणाऱ्या प्रामाणिक करदात्यांचे महापौर रवी लांडगे आणि आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी महापालिकेच्या वतीने आभार मानले आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरात सध्या निवासी, बिगरनिवासी, औद्योगिक व इतर मिळून सुमारे ७ लाख ३२ हजार मालमत्तांची नोंद असून, त्यापैकी ६ लाख ३१ हजार ६१५ मालमत्ताधारकांनी कराचा भरणा केला आहे. दरवर्षी कर भरणाऱ्यांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत असून नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. कर संकलन व कर आकारणी विभागाने गतवर्षी ९६६ कोटी रुपयांचा कर वसूल केला होता. यंदा महापालिका निवडणुकीच्या कामात कर संकलन विभागाचे कर्मचारी तीन महिने गुंतले होते. त्याचा परिणाम मालमत्ता कर वसुलीवर झाला आहे.

यंदा कर वसुलीसाठी महापौर लांडगे, उपमहापौर शर्मिला बाबर, सभागृह नेते प्रशांत शितोळे, स्थायी समिती अध्यक्ष अभिषेक बारणे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली उपआयुक्त सचिन पवार आणि कर संकलन व कर आकारणी विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी मेहनत घेतली. 

गेल्या वर्षभरापासून थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करणे, नळ जोडणी खंडित करणे, मोठ्या थकबाकीदारांची नावे वर्तमानपत्रात प्रसिद्ध करणे, शहरातील वर्दळीच्या ठिकाणी, मुख्य चौक, रस्ते इ. ठिकाणी होर्डिंग्ज व फ्लेक्सद्वारे जाहिरात प्रसिद्धी, पॅम्पलेट वाटप, सोशल मीडियाद्वारे चित्रफीत, लाऊडस्पीकरवर थकबाकीदारांच्या नावांची घोषणा करणे, जाहिरात प्रसिद्धी या उपाययोजना केल्या. याचे फलित म्हणूनच ९६१ कोटी कर वसूल झाला आहे. नागरिकांना कर भरण्यासाठी ऑनलाइन व ऑफलाइन सुविधा उपलब्ध  होती. मालमत्ताधारकांच्या विविध घटकांसाठी ऑनलाइन व ऑफलाइन कर सवलत योजना, थकित कर वसुलीसाठी वेळोवेळी घरभेटी देणे, पत्र देणे, जप्तीपूर्व नोटिसा देण्याची कार्यवाही करण्यात आली.

अभय योजनेला नागरिकांचा प्रतिसाद -

महापालिकेच्या वतीने थकबाकीदार मालमत्ताधारकांना दिलासा देण्यासाठी अभय योजना राबविण्यात आली. दिनांक  १ मार्च ते ३१ मार्च २०२६ पर्यंत ७० हजार २३८ थकबाकीदारांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. ३१ दिवसांमध्ये तब्बल २०२ कोटी १७ लाख रुपयांचा मालमत्ता कर वसूल झाला आहे. या मालमत्ताधारकांना ५५ कोटी ४७ लाख रुपयांची सवलत मिळाली. या योजनेमुळे नागरिकांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला असून, महापालिकेच्या महसुलातही लक्षणीय वाढ झाली आहे. शहरात कर संकलनासाठी महापालिकेचे १८ झोन आहेत. यामध्ये वाकड विभागीय कार्यालयांतर्गत सर्वाधिक वसुली झाली आहे, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे. 

महापालिकेसाठी अभिमानाचा विषय....

पिंपरी चिंचवडमधील नागरिकांनी मालमत्ता कर भरण्यास दिलेला सकारात्मक प्रतिसाद हा महापालिकेसाठी अभिमानाचा विषय आहे. कर भरणे ही फक्त जबाबदारी नसून शहराच्या विकासात थेट सहभाग नोंदविण्याची प्रक्रिया आहे. पायाभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा आणि स्वच्छता यांसारख्या सेवांना बळकटी देण्यासाठी कर महसूल अत्यंत महत्त्वाचा असतो. अभय योजनेमुळे कर वसुलीत वाढ होण्यास मदत झाली आहे.

- महापौर रवी लांडगे 


नागरिकांचे मनःपूर्वक आभार...

कर संकलन विभागाच्या प्रभावी नियोजनासोबतच नागरिकांसाठी सुलभ आणि पारदर्शक सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे यंदा कर वसुलीत लक्षणीय वाढ साध्य झाली आहे. प्रामाणिकपणे कर भरणाऱ्या सर्व नागरिकांचे मनःपूर्वक आभार.

- महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका 

विभागीय कार्यालयनिहाय करवसुलीची आकडेवारी ....

वाकडमध्ये ११७ कोटी ७८ लाख ४९ हजार ७८४, थेरगाव ९८ कोटी ५९ लाख ३२ हजार २६४, चिखली ८८ कोटी ६५ लाख ६० हजार ६४६, किवळे ६५ कोटी ३४ लाख ८० हजार ८१८, भोसरी ६४ कोटी ५२ लाख ५७ हजार ९२१, मोशी ६३ कोटी ५३ लाख ८४ हजार ३१२, चिंचवड ६० कोटी १२ लाख २३ हजार ६५६, कस्पटे वस्ती ५८ कोटी २५ लाख ६९ हजार ४२०, पिंपरी-वाघेरे ५२ कोटी ५९ लाख ४४ हजार ५०८, सांगवी ४८ कोटी ६५ लाख ५९ हजार ९२५, मनपा भवन ४१ कोटी ८३ लाख १४ हजार ९१८, आकुर्डी ४१ कोटी ९ लाख ४४ हजार ५४४, च-होली ३८ कोटी ८२ लाख ५५ हजार २१, फुगेवाडी ३५ कोटी ४९ लाख २८ हजार ४९६, दिघी-बोपखेल २७ कोटी ७० लाख २९ हजार २३४ तळवडे २६ कोटी ४८ लाख ४६ हजार २९५, निगडी प्राधिकरण २३ कोटी ७७ लाख ६३ हजार ४६६, पिंपरीनगर ८ कोटी ४५ लाख ८१ हजार २१५ असा कर वसूल झाला आहे..

विविध पद्धतींनी वसुली....

ऑनलाइन - ६९७ कोटी १९ लाख

रोख - १०४ कोटी ८७ लाख

धनादेशाद्वारे - ११९ कोटी १३ लाख

ईडीसी - ६ लाख

डीडी - ७ कोटी ९ लाख


कर भरणाऱ्या मालमत्तांची आकडेवारी....

औद्योगिक - ४ हजार ८१६

निवासी - ५ लाख ५५ हजार २७०

बिगरनिवासी - ५२ हजार ६४५

मिश्र - १३ हजार ७७६

मोकळी जमीन - ५ हजार ७७

इतर - ३१

एकूण - ६ लाख २७ हजार ७९०


मागील आठ वर्षांतील करवसुली

२०१८-१९ : ४७१ कोटी

२०१९-२० : ४८० कोटी

२०२०-२१ : ५५३ कोटी

२०२१-२२ : ६२८ कोटी

२०२२-२३ : ८१६ कोटी

२०२३-२४ : ९७७ कोटी

२०२४-२५ : ९६६ कोटी

२०२५-२६ : ९६१ कोटी



Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories